धाराशिव (प्रतिनिधी)- समाजकल्याण विभागाकडून चर्मकार समाजावर सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप करत राष्ट्रीय चर्मकार महासंघ धाराशिव शाखेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. ही तक्रार जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मार्फत पाठविण्यात आली असून, समाजाच्या मूलभूत गरजांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, समाजकल्याण विभागाच्या विविध योजना शिष्यवृत्ती, विशेष घटक योजना, प्रशिक्षण योजना या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नसून, इतर समाजांपर्यंत तो मर्यादितपणे जात आहे. त्यामुळे चर्मकार समाजातील विद्यार्थी, बेरोजगार तरुण आणि कुटुंबांना याचा फटका बसत आहे.
महासंघाने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना व समाजकल्याण मंत्र्यांना निवेदन देऊन योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. जर वेळेत योग्य निर्णय घेण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल. असाही इशारा यावेळी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर प्रदेश अध्यक्ष नितीन शेरखाने, गणपत कांबळे, जिल्हा सचिव शांतीनाथ शेरखाने, साहेबराव शेरखाने, संपत शेरखाने, शहाजी शेरखाने, माणिक डोलारे ,बापू वाघमारे,प्रदीप भक्ते आदींच्या स्वाक्षरी आहेत.