धाराशिव (प्रतिनिधी) - एकल महिलेला २०१७ पासून न्याय मिळवून देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. संबंधित पोलीस अधिकारी पीडित महिलेच्या पती व सासर्याकडून पैसे स्विकारुन महिलेलाच रात्री बारा वाजता पोलीस ठाण्यात बोलवून गुंडा मार्फत अश्लील भाषेत शिवीगाळ करुन अन्याय करतात. तर जिल्हाधिकारी यांच्याकडे कैफियत मांडल्यानंतर ते पुन्हा त्याच पोलिसाकडे पाठवितात. त्यामुळे निराश व हतबल झालेल्या एका ३२ वर्षीय महिलेने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही ही घटना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच दि.२९ मे रोजी घडली. विशेष म्हणजे उपनिवासी जिल्हाधिकारी शोभा जाधव या महिला अधिकाऱ्यांनी त्या अबलेला न्याय देण्याऐवजी अतिशय असंवेदनशीलपणे त्याकडे दुर्लक्ष करीत गाडीमध्ये बसून निघून गेल्या. त्यामुळे जे न्याय देणार आहेत तेच जर इतके निष्ठूर असतील तर न्याय मागायचा कोणाकडे आणि देणार तरी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे ?
याबाबत अधिक माहिती अशी की, कळंब तालुक्यातील बोरगाव धनेश्वरी येथील रहिवासी व हल्ली मुक्कामी कळंब येथील अश्विनी संदीप चोरघडे यांचे दि५ मे २०११ साली संदीप लक्ष्मण चोरघडे यांच्याबरोबर लग्न झाले. लग्नानंतर दोन-चार महिने व्यवस्थित चालले होते. मात्र, सासरे लक्ष्मण, सासू आशाबाई, ननंद साधना प्रशांत भराटे, नंदावा प्रशांत हरिभाऊ भराटे यांनी संगणमत करून संदीप चा दुसऱ्या महिलेशी (कोमल उर्फ सवाती) यांचा दुसरा ठंविवाह लावून दिला आहे. त्यामुळे संदीप चोरघडे यांच्याविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी हा कौटुंबिक मॅटर आहे. त्यामुळे संदीप यांच्यावर गुन्हे दाखल करु नसल्याचे पोलीस निरीक्षक संग्राम थोरात व बीट अंमलदार यांनी सांगितले. संदीप व सासरे यांच्याशी संगनमत करुन अश्विनी यांच्या विरुद्ध किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करू असे सांगून अश्विनीस हाकलून दिले. तसेच दि.१० मे रोजी अश्विनी यांना रात्री १२ वाजता पोलीस ठाण्यामध्ये फोन करून बेकायदेशीररित्या बोलावून घेऊन कोणतीही महिला पोलीस कर्मचारी नसताना तेथे असलेल्या बाळकृष्ण उर्फ राजू लहू कवडे याने पाच लाख रुपये घे आणि सोडचिट्टी दे, आमच्या पाहुण्याला सोडचिट्टी दे म्हणून अश्लील भाषेत पोलीस ठाण्यात शिवीगाळ केली. तर पोनि थोरात यांनी तुझी चमडी उधळून टाकेन, पाच लाख रुपये घे आणि विषय मिटवून घे नाहीतर तुझे काही खरे नाही, असे म्हणून अश्लील भाषेत शिवीगाळ करून अपमानित केले. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेली असून त्या फुटेजचे अवलोकन करण्यात यावे. याबाबत अश्विनी यांनी दि.२० मे रोजी जिल्हाधिकारी आत्मदहन करण्याचा इशारा दिला. त्यावेळी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी त्यांची समजूत काढून संबंधित अधिकाऱ्याला कारवाई करण्याचे निर्देश दिले. मात्र वाशी पोलीस अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई न करता त्यांच्याकडून मनमानीपणे दुसराच जबाब लिहून घेतला आहे. त्यामुळे मला न्याय द्यावा या मागणीसाठी अश्विनी चोरघडे यांनी दि.२९ मे रोजी निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्याशी कारवाई करण्याची मागणी केली. मात्र त्यांनी देखील काही न केल्यामुळे अश्विनी चोरघडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित असलेल्या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी केला. हा प्रकार सुरू असतानाच पोलिसांची एक गाडी आली. मात्र अश्विनी यांनी न्याय मिळत नसेल तर मेलेले बरे, मेल्यावर तरी न्याय मिळेल असे सांगत प्रवेशद्वारासमोरच ठिय्या मांडला. मी आज कोणत्याही परिस्थितीत मरणारच असा पवित्रा घेतला. या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांनी दुसरी गाडी मागवून अश्विनी यांना गाडीत कोंबताना पोलीस कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने हा सर्व प्रकार पाहून चकीत व अचंबित झाले.