धाराशिव (प्रतिनिधी)- शासनाच्या विविध योजना आहेत.या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करतांना जिल्हयातील नागरिकांना आणि लाभार्थ्यांना विविध सेवा आणि योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजनातून काम करावे. असे निर्देश पालक सचिव अंशु सिन्हा यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज विविध योजनांचा आढावा घेतांना श्रीमती.सिन्हा बोलत होत्या.यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष व निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
सिन्हा बोलतांना पुढे म्हणाल्या की, जलजीवन मिशन कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या गावांसाठी पिण्याच्या पाण्याच्या योजनांची कामे सुरू आहेत. ती कामे दर्जेदार स्वरूपाची करण्यात यावी. ग्रामस्थांना या योजनेमुळे घरपोच शुध्द व स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणार आहे.त्यामुळे संबंधित ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार आहे.शुध्द व स्वच्छ पाणी या योजनेतून मिळणार असल्याने जलजन्य आजारांचा सामना करण्याची वेळ ग्रामस्थांवर येणार नाही.निवारा ही प्रत्येकाची मुलभूत गरज आहे.ज्या घरकुल योजनेतून संबंधित लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या घरकुलांची कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजे.ज्या घरकुल योजनेसाठी निधीची कमरता आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून घ्यावा. असे त्यांनी सांगितले. पी.एम.किसान योजनेचा लाभ योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना मिळावा यासाठी आवश्यक ती पूर्तता संबंधित शेतकऱ्यांकडून करून घेण्यात यावी.
या बैठकीला उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर,संतोष राऊत, अरूणा गायकवाड,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने,जिल्हा नियोजन अधिकारी अर्जून झाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोडभरले, भूजबळ, गिरी, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी,जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय गुरव,नगर पालीका प्रशासन अधिकारी श्री.जाधवर,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता कुलकर्णी,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन सरवदे यांची उपस्थिती होती.
सीएसआर निधीतून रस्ते करा
जिल्हयातील शेतकऱ्यांना पिक लागवडीसाठी व शेत मशागतीसाठी तसेच शेतातील उत्पादीत माल घरी व बाजरपेठेत घेवून जाता यावा यासाठी पाणंद रस्ते चांगले असले पाहिजे. असे सांगून सिन्हा म्हणाल्या की, ही कामे योजनेतून,अभिसरणातून व सीएसआर निधीतून करावी. त्यामुळे शेतकऱ्यांना सुविधा निर्माण होईल.बचतगटाचे उत्पादीत साहित्य व वस्तू हया स्वस्त धान्य दुकानातून विक्रीसाठी ठेवण्यात येत आहे.हा एक चांगला उपक्रम जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. त्यामुळे बचतगटाच्या उत्पादीत मालाला एक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.ई- ऑफीस प्रणाली यंत्रणांनी अंमलात आणावी असे त्यांनी सांगितले.
50 लाख वृक्ष लागवड करणार
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार म्हणाले,यंदाच्या पावसाळयात जिल्हयात 50 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे.तर एकाच दिवशी 24 तासात 15 लक्ष वृक्ष लागवड करून एक विक्रम करण्याचा आमचा संकल्प आहे.जिल्हयातील नागरिकांना विविध योजना व सेवांचा लाभ देण्यात येत आहे.लोकशाही दिन,आपले सरकार पोर्टलच्या माध्यामातून विविध सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात येत आहे. माहितीचा अधिकार कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.