तुळजापूर (प्रतिनिधी)- नुकतेच लग्न झाल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाची हरवलेली सोन्याची अंगठी सुरक्षा रक्षकाने सुखरूप परत केली. अर्ध्या तोळ्याहून अधिक म्हणजेच जवळपास 50 हजार रुपयांची मौल्यवान अंगठी मंदिरातील सतर्क व्यवस्थेमुळे परत मिळाल्यामुळे भाविकाने समाधान व्यक्त करत मंदिर संस्थान चे आभार मानले.

यशवंत पाटील हे धारशिवच्या परांडा जिल्ह्यातील वाकडी गावचे रहिवासी श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले असता त्यांची अंगठी हरवली. दर्शन मंडपातील पहिल्या मजल्यावर सुरक्षा रक्षक भोजने रोहन यांना खाली जमिनीवर पडलेली सोन्याची अंगठी सापडली असता त्यांनी ती दर्शन मंडप नियंत्रण कक्ष येथे जमा केली. अंगठी हरविल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित भाविकाने मंदिर संस्थानच्या सुरक्षा विभागाकडे चौकशी केली असता त्यांना दर्शन मंडप नियंत्रण कक्ष येथे पाठविण्यात आले. तेव्हा त्यांची ओळख पटवून आणि शहानिशा करून त्यांना अंगठी परत देण्यात आली.

सर्व प्रक्रियेत खूप आपुलकीने मंदिर व्यवस्थापनाने व सुरक्षा विभागाने मदत केल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी मंदिरचे रोखपाल महेंद्र आदमाने, सुरक्षा निरीक्षक श्रीकांत पवार,  प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम पाटील, सुरक्षा सुपरवायझर योगेश फडके, प्रशांत अलकुंटे, अनिल लोखंडे इत्यादी उपस्थित होते.


 
Top