धाराशिव (प्रतिनिधी)-आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला उर्जितावस्था देण्यासाठी शासनाकडून सनियंत्रण समितीद्वारे प्रयत्न होत आहेत. याचाच एक भाग म्हणून सह सचिव तथा अपर निबंधक मंत्रालय संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि.४) बँकेत संचालक, सहकारी पतसंस्था प्रतिनिधी,बँकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी बँकेच्या उर्जितावस्थेसाठी बँकेतील ठेव वाढविणे व भाग गोळा करणे महत्वाचे आहे असे आवाहन श्री पाटील यांनी केल्यानंतर या आवाहनास प्रतिसाद देत सहकारी पतसंस्था, बँकेचे पदाधिकारी, संचालक तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपआपल्या पातळीवर ठेव ठेवण्याचे जाहीर केले. याची रक्कम ८१ लाख ७५ हजार रुपयांच्या घरात गेल्याने बँकेच्या अच्छे दिनसाठी एक सकारात्मक पाऊल पडल्याचे दिसत आहे.

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक घडी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. याच अनुशंगाने वर्धा जिल्हा बँकेच्या धर्तीवर सहकार विभागाचे सह सचिव तथा अपर निबंधक मंत्रालय संतोष पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी बँकेत बैठक पार पडली. यावेळी बैठकीस बँकेचे व्हाईस चेअरमन मधुकर मोटे, संचालक संजय देशमुख,प्रा. संजय कांबळे, महेबुब शेख, जिल्हा उपनिबंधक पांडुरंग साठे, सनियंत्रण समिती सदस्य एस.आर.नाईकवाडी, सहाय्यक निबंधक श्री अंबिलपुरे, श्री काळे यांच्यासह जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचे चेअरमन, प्रतिनिधी, बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री  पाटील यांनी बँकेला उर्जितावस्था आणण्यासाठी बँकेच्या ठेवी वाढणे, भाग खरेदी करण्याचे आवाहन केले. याला उपस्थित संचालक, पतसंस्था चेअरमन तसेच बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत अवघ्या दोन तासात ८१ लाख ७५ हजार रुपयांच्या ठेवी ठेवण्याची घोषणा केली. मिळालेला हा  प्रतिसाद पाहुन श्री पाटील यांनी या ठेव व शेअर्स स्विकारण्याच्या  शुभारंभास राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक दिपक तावरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत लवकरच करण्याचे जाहीर केले. तसेच बैठकीतूनच त्यांनी सहकारमंत्री श्री पाटील यांना संपर्क करून याबाबत उपस्थितीचे निमंत्रण देत विनंती केली. या विनंतीला सहकारमंत्र्यांनीही सकारात्मक  प्रतिसाद देत कार्यक्रमाचे नियोजन करून तारीख सांगा मी येणार असे जाहीर केले. या बैठकीच्या नियोजनासाठी डीसीसी बँकेचे मुख्याधिकारी एस.एम ग़ायकवाड, बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विनोद लावंड यांच्यासह सहकार बोर्डाचे श्री जाधव व बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.  


३८ जणांकडून ८२ लाख ठेव ठेवण्याची घोषणा

पाटील यांनी आवाहन केल्यानंतर बैठकीस उपस्थित असलेल्या भाई उध्दवराव पाटील शिक्षक सेवकांची पतसंस्थेचे सचिव अमरसिंह देशमुख यांनी २५ लाख, दिशा सहकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. दिग्गज दापके यांनी ५ लाख, हनुमान बिगरशेती पतसंस्थेचे चेअरमन नानासाहेब भोसले यांनी ५ लाख, समता सेवाभावी शिक्षक पतसंस्थेने ३ लाख ठेव ठेवण्याची घोषणा केली. यावेळी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील ५ लाख, व्हाईस चेअरमन मधुकर मोटे ५ लाख, संचालक नागप्पा पाटील २.५० लाख यांच्यासह स्वत: सहकार सह सचिव संतोष पाटील, अपर निबंधक सह आयुक्त कार्यालय पुणे राजेश सुरवसे, सह निबंधक लातूर सुनिल शिरापूरकर, जिल्हा उपनिबंधक पांडुरंग साठे, सनियंत्रण समिती सदस्य एस.आर.नाईकवाडी यांनीही बँकेत ठेव ठेवण्याचे जाहीर केले. यांच्यासह बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मिळून या बैठकीत एकूण ८१ लाख ७५ हजार रुपयांच्या ठेव ठेवण्याचे जाहीर केले.

 
Top