धाराशिव (प्रतिनिधी)- आई तुळजाभवानीच्या कृपेने मी एसटी महामंडळाचा अध्यक्ष झाल्यानंतर माझ्या हस्ते पहिलेच उद्घाटन तुळजापूर बसस्थानकाचे व्हावे,हे माझं भाग्य समजतो आणि अशाच प्रकारची सुसज्ज बसस्थानके राज्यभरात उभारण्याचा आम्ही प्रयत्न करू अशी ग्वाही परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
तुळजापूर जुने बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री श्री सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजीतसिंह पाटील,माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव,अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना,एस टी च्या नाशिक विभागाच्या उपमहाव्यवस्थापक अमृता ताम्हणकर व विभाग नियंत्रक विनोद भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
सरनाईक म्हणाले की,मी मंत्री झाल्यापासून सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी मी एसटीतून प्रवास केला,त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललो यातून मला त्यांचे प्रश्न समजले.आज दररोज सरासरी 55 लाख प्रवासी एसटीच्या सेवेचा लाभ घेत आहेत.त्यांना सुरक्षित आणि वक्तशीर सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यामुळे भविष्यात चांगली बसस्थानके निर्माण करून तेथे महिला व पुरुषांसाठी स्वच्छ प्रसाधनगृहे,सुसज्य प्रवासी प्रतीक्षालये तयार करणे व ती सातत्याने स्वच्छ राहतील यासाठी देखभाल यंत्रणा ठेवणे हे देखील महत्त्वाचे असणार आहे.
अत्याधुनिक रुग्णालय लवकरच जनतेच्या सेवेसाठी
पालकमंत्री सरनाईक पुढे म्हणाले की,तुळजापूर येथे महाराष्ट्र शासन आणि श्री.तुळजाभवानी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 100 खाटांचे अत्याधुनिक असे मल्टीस्पेशलिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सर्व रुग्णांना मोफत उपचारांसाठी इंग्लंडमध्ये करण्यात येणार आहेत.त्यामुळे तुळजापुर व परिसरातील सर्व सामान्य जनतेची सेवा करण्याचे भाग्य या माध्यमातून आई तुळजाभवानी आम्हाला दिले आहे, त्याबद्दल मी शतशः ऋणी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव बसस्थानकाला देणार
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे आदर्श आहेत.त्यांचे नाव तुळजापूर बसस्थानकाला आणि धाराशिव बसस्थानकाला देण्यात येईल असे आश्वासन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिले.या उद्घाटन प्रसंगी अनेक नागरिक, प्रवासी व एसटीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.