भूम (प्रतिनिधी)-  पाथरी जिल्हा परभणी येथील टोम्पे  कुटुंब प्रमुखाचा  सावकारकीतील पैशाच्या मागणीसाठी अपहरण करून अमानुषपणे मारहाण केली, खून केला, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करून कुटुंबाला दिलासा द्यावा अशी मागणी समस्त कोष्टी समाज बांधवांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. 

उपविभाग अधिकारी भूम यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले की,  पाथरी येथील अनंता हरिभाऊ टोम्पे हे वाहन चालक म्हणून काम करत असताना नेहमीच्या आर्थिक देवाणीच्या सावकारकीच्या येणे रकमेसाठी बेकायदेशीरपणे सावकारकी करणाऱ्यांनी अनंता टोम्पे यांचे घरातून अपहरण केले. त्यांचा दीड दिवस शोध लागला नाही. अखेर त्यांचा मृतदेह 14 एप्रिल 2025 रोजी दुपारी शौचालयात अतिशय निर्दयपणे अवस्थेत खून करून टाकलेला आढळला. या हत्या प्रकरणाचा विशेष तपास यंत्रणेकडून तपास करावा, आरोपीवर कठोर कारवाई करावी, बेघर असलेल्या टोम्पे कुटुंबीयांना तात्काळ  जागेसह घरकुल बांधून द्यावे, त्यांचे पुनर्वसन करावे. अशी मागणी कोष्टी समाज बांधव भूम तालुक्याच्यावतीने उपविभागीय अधिकारी भूम यांचे मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनावर कोष्टी समाज ट्रस्ट अध्यक्ष विठ्ठल बागडे, सचिव शंकर खामकर, सदस्य योगेश आसलकर, उपाध्यक्ष शाम वारे,  श्याम बागडे, युवराज वरवडे, शंकर मेहेत्रे, प्रकाश बागडे, अंबादास वरवडे, संतोष गुरसाळी, बाळू बाबर, प्रथम वरवडे, नवनाथ रोकडे, मनोज बोत्रे, योगेश दिवटे, सुनील दिवटे आदींच्या सह्या आहेत.


 
Top