भूम (प्रतिनिधी)- पंढरपूर-कुर्डुवाडी-परंडा-भूम-वाशी-बीड-जालना-शेगाव हा नवीन रेल्वेमार्ग सुरू करण्याच्या मागणीसाठी गजानन महाराज मठ भूम येथे एक महत्त्वपूर्ण सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत विविध राजकीय पक्षांचे तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि माध्यम क्षेत्रातील मान्यवर प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या रेल्वेमार्गाच्या निर्मितीमुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार असून, विशेषतः शिक्षण, उद्योग, व्यापार, तीर्थक्षेत्र, पर्यटन व रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील, असे मत सर्व वक्त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी पाटील यांनी केले. त्यांनी या मार्गाची गरज, त्याचे सामाजिक आणि भौगोलिक फायदे स्पष्ट करत या प्रकल्पासाठी जनतेने एकत्र येण्याची गरज अधोरेखित केली. सूत्रसंचालन अलीम शेख यांनी केले.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भगवान बांगर, रासपाचे गजानन सोलनकर, शिवसेनेचे अनिल शेंडगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बिभीषण भैरट, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष हनुमंत पाटूळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे भूम-परंडा-वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप, काँग्रेसचे विलास शाळू, शिक्षक संजीवन खांडेकर, पत्रकार धनाजी शेटे, प्रा. सतिश मातने आणि भाजपचे भूम-परंडा-वाशी विधानसभाध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी ‌‘रेल्वे संघर्ष समिती'ची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली. उपस्थितांचे आभार संतोष वरळे यांनी मानले. 


 
Top