धाराशिव (प्रतिनिधी)- येथील साहित्यिक तथा धाराशिव जिल्हा पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष, पुरातत्व विषयाचे अभ्यासक युवराज नळे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या विद्यापीठात 'भारतीय प्राचीन इतिहास संस्कृती आणि पुरातत्व शास्त्र' या विषयात 8.36 सीजीपीए सह 'ए' ग्रेड मिळवत एम. ए. परिक्षेत विद्यापीठ पातळीवर ते सर्व तृतीय आले होते. नंतर त्यांनी पीएच्.डी. साठी आवश्यक असणारी पेट परीक्षा देऊन त्या परीक्षेतही ओबीसी प्रवर्गातून ते सर्वप्रथम तर सर्वसाधारण वर्गातून ते पाचवे होते. पीएच्.डी. साठी आवश्यक असणारी पेट परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे मेरिट आधारे त्यांना इतिहास विषयातून पीएच्.डी. संशोधन करण्यासाठी मान्यता मिळालेली आहे. “धाराशिव जिल्ह्यातील पुरातत्वीय आणि ऐतिहासिक स्थळांचे पर्यटन व रोजगार निर्मितीमधील योगदान: एक चिकित्सक अभ्यास‘ या विषयास संशोधनासाठी विद्यापीठाने मान्यता दिली असून प्रो. डॉ. व्ही.बी. वाघमारे, इतिहास विभाग प्रमुख, श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, यांच्या मार्गदर्शनाखाली ते त्यांचे संशोधन कार्य करणार आहेत.
या संशोधनाच्या निमित्ताने धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांचे पर्यटनाच्या व रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने संशोधन आणि चिंतन होणार आहे. याचा खूप मोठा फायदा धाराशिव जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायासाठी होऊ शकतो. हे संशोधन एकूणच जिल्ह्याचे नावलौकिक वाढविण्यासाठी व जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची राष्ट्रीय पातळीवरती नोंद होण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यात तीळमात्र शंका नाही. युवराज नळे यांचे या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.