भूम (प्रतिनिधी)- साहेब पाया पडतो रस्त्याचे काम पूर्ण करा. अंतरगाव ग्रामस्थांनी लोटांगण घेत सार्वजनिक बांधकाम कार्यालयात आंदोलन केले. 

अंतरगाव येथे मागील दोन वर्षांपासून बार्शी ते पाथरूड (अंतरगाव हद्दीतील ) रोड मंजूर आहे. अद्याप त्याचे काम पूर्ण झाले नाही. याबाबत वारंवार उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देऊनही अद्याप रस्त्याचे काम झाले नाही. खराब रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, नागरिक, वृद्ध नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी आज सार्वजनिक बांधकाम उपविभाग येथे अंतरगाव येथील नागरिक हलक्या वाजवत दाखल झाले. व त्यांनी कार्यालयाच्या दिशेने लोटांगण घेत उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदन देत असताना सर्व गावकऱ्यांनी अक्षरशः अधिकाऱ्याचे पाय धरले व “साहेब पाया पडतो पण आमचा रस्ता पूर्ण करा “ अशी विनंती केली. यावर अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले नाही तर दिनांक 19 मे रोजी रस्त्यावर मधोमध खड्डा करून अर्धे गाडून घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदन देण्यात आला. या आंदोलनामुळे काही काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची धावपळ झाल्याचे दिसून आले. यावेळी ओंकार उद्धव गोरे, गणेश शिवाजी लोद, बिरबल माळी, संतोष गोरे व गावातील नागरिक उपस्थित होते. तसेच त्यांनी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला होता.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दि 19 तारखेपर्यंत काम सुरु करणार असल्याचे लेखी पत्र घेतल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.

 
Top