उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याच्या तक्रारी आहेत गुंडगिरीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी याबाबत कठोर भूमिका घ्यावी. अशा कडक सूचना धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बैठकीत पोलिसांना दिल्या.
उमरगा शहरातील कायदा व सुव्यवस्था याबाबत शासकीय विश्रामगृहावर मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हा पोलिस प्रमुख संजय जाधव, शिवसेनेचे डॉ. अजिंक्य पाटील, बाजार समिती माजी सभापती सुलतान शेठ, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले आदींची उपस्थिती होती.
यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, शहरात अनेक तक्रारी दाखल करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पोलिसांना फोन करावा लागतो ही खेदाची बाब आहे. पोलिसांनी निपक्ष पाती पणे काम करावे. गुन्हेगार कुठल्या ना कुठल्या पक्षाचा संबंधित असतातच. मात्र पोलिसांनी राजकीय दबाव खाली काम करता कामा नये. सर्वसामान्यांच्या तक्रारीचे निराकरण व्हावे. पण येथे होताना दिसत नाही. शहरात भर दिवसा हत्याचे प्रयत्न झाला. त्याबाबत पोलिसच गुन्हेगारांना पाठीशी घालतात असा आरोप नातेवाईकांनी यावेळी केला. पोलीस व गुन्हेगारांचे मिलीभगत आहे. त्यामुळे नातेवाईकांना योग्य तो न्याय मिळत नाही.
यावेळी बाजार समिती माजी सभापती रणधीर पवार, लोहारा तालुका शिवसेनाप्रमुख अमोल बिराजदार, लोहारा शहर प्रमुख सलीम शेख, माजी जि प सदस्य दीपक जवळगे जिल्हा शेतकरी संघटक विजयकुमार नागणे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अर्जुन बिराजदार, राजेंद्र समाने, सतीश जाधव, महेश शिंदे, प्रा डी. के. माने आदी पदाधिकारी व उमरगा मुरूम लोहारा पोलीस अधिकारी उपस्थित होते.
आमदारांनी पण केली तक्रार
यावेळी आमदार प्रवीण स्वामी म्हणाले की, या पोलीस ठाण्यात बहुतांश पोलीस अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची बदली व्हावी. शहरात मुलीच्या छेडछाडचे प्रमाण वाढले असून त्यामुळे पिंक पथकाने सतर्कता बाळगावी व योग्य ती दखल घ्यावी. पोलिसांनी लोकांच्या तक्रारीचे जलद गतीने निरसन करावे व संबंधितावर दुजाभाव न करता जनतेला न्याय द्यावा. अशी सूचना यावेळी पोलिसांना दिल्या.