उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील एका गावात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून उमरगा पोलिसांनी एका तरूणाविरूध्द भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 12 मे 2025 रोजी पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित मुलगी घरी असताना गावातीलच एका तरूणाने तिला फोन केला. यावेळी त्याने पीडितेच्या भावाला आणि आईला जीवे मारण्याची धमकी देवून तिला घराबाहेर बोलावून घेतले. त्यानंतर गावातील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या शेडच्या पाठीमागे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपीने पीडितेला कोणास सांगितल्यास गावात बदनामी करण्याची धमकीही दिली. मात्र पीडितेने धाडस दाखवत 13 मे 2025 रोजी उमरगा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरूणाविरूध्द भारतीय न्याय संहिता कलम 64, 64 (I), 65 (A), 74, 78, 351 (2) 351 (3) तसेच बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमातील कलम 4,6 आणि 12 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 
Top