कळंब (प्रतिनिधी)-  धाराशिव-बीड-संभाजीनगर नवीन रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणासाठी रेल्वे मंत्रालयाने भरीव आर्थिक तरतूद केली आहे. सदरील सर्वेक्षणाचे काम हाती घेतले असून ते प्रगतीपथावर आहे असे खात्रीलायक सुत्रांकडून समजते. या नवीन रेल्वे मार्गावर कळंब स्टेशनचा अंतर्भाव करण्यासाठी व कामाला गती देण्यासाठी कळंब रेल्वे कृती समिती तर्फे पाठपुरावा केला जात आहे. 

याचाच एक भाग म्हणून समितीच्या वतीने रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव सहीत मध्य रेल्वेची विविध कार्यालये व प्रादेशिक सल्लागार डॉ. आदित्य पतकराव यांना पत्राद्वारे संपर्क साधला आहे. त्यामध्ये त्यांना कळंब शहरासंबंधित माहिती पुरवण्यात आली आहे. यात कळंबचा वाढता विस्तार, कळंबची लोकसंख्या अंदाजे 45000, येथे कार्यरत असलेले विविध शासकीय तालुका/ विभागीय कार्यालये, न्यायालये, विस्तारत चाललेला मेडिकल हब, धाराशिव जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ,कपडा बाजार,तालुका व आसपास परिसरातील दहा साखर कारखाने, दोन गुळ पावडर यूनिट, दोन डेअरी इंडस्ट्रीज, सोयाबीन मील, दोन तिर्थक्षेत्रे, मोठ्या शहरांना ये-जा करणारा मोठा नौकर वर्ग आहे. तसेच कळंब रोड तडवळे येथे रेल्वे विभागाची 50 एकर जागा आहे. येथे लातूर- मुंबई मार्गावर ये-जा करणाऱ्या एक्सप्रेस व मेल सहीत सर्व रेल्वे गाड्यांना थांबा देणे आणि लातूर- मुंबई वंदे भारत गाडी सुरू करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. 

तसेच या कामाला अधिक चालना देण्यासाठी बीड व धाराशिवच्या खासदार यांना भेटून या कामाचा पाठपुरावा करणार असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे, सचिव ॲड मनोज चौंदे, सह सचिव डॉ. अमीत पाटील, प्रसिध्दी प्रमुख माधवसिंह राजपूत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात माहिती दिली आहे

 
Top