धाराशिव (प्रतिनिधी)-  राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय सेवा अधिक पारदर्शक व जलद करण्यासाठी 'नेक्स्ट जनरेशन हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम' प्रणाली लागू करण्यात येत आहे. धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ही प्रणाली 7 मे 2025 पासून अंमलात येणार आहे.

ही डिजिटल प्रणाली रुग्णसेवा अधिक कार्यक्षम बनवणार असून, सर्व वैद्यकीय सेवा एका संगणकीकृत प्रणालीद्वारे पुरवल्या जाणार आहेत. रुग्णांची नोंदणी, तपासणी, अहवाल व वैद्यकीय इतिहास या प्रणालीत डिजिटल स्वरूपात नोंदवले जातील. त्यामुळे रुग्णांना वारंवार कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही आणि तपासणी अहवालासाठी प्रतीक्षाही करावी लागणार नाही.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या आदेशानुसार,या नव्या प्रणालीच्या अंमलबजावणीसह काही शुल्कातही सुधारणा करण्यात आली आहे. यामध्ये ओपीडी नोंदणी शुल्क पूर्वीच्या 10 रुपये ऐवजी आता 20 रुपये इतके असेल.तसेच प्रयोगशाळा आणि इतर तपासणी शुल्कातही अत्यल्प वाढ करण्यात आली आहे.

मात्र, दिनांक 04.07.2017 रोजीच्या शासन निर्णयात नमूद लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच सूट लागू राहील. याशिवाय 'आयुष्मान भारत आरोग्य खाते' (आभा) कार्ड धारकांना ओपीडी शुल्क वगळता इतर सर्व सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या संदर्भात अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान यांनी सांगितले की,“ही प्रणाली रुग्ण व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी एक सुसंगत, पारदर्शक आणि सुलभ सेवा पुरवणारी ठरेल.” एकच हेल्थ आयडीद्वारे रुग्णांचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास सुरक्षितपणे जतन केला जाईल,अशी माहिती त्यांनी दिली. 'नेक्स्ट जनरेशन हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम' प्रणालीमुळे धाराशिव जिल्ह्यातील रुग्णसेवेच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण बदल घडून येणार आहे.


 
Top