धाराशिव (प्रतिनिधी)- दि.19.05.2025 रोजी सकाळी मुरुम पोलीस ठाणे हद्दीतील दस्तापूर येथे हैद्राबाद महामार्गावर एक बोलेरो जीप उभी असल्याची आढळुन आली. सदर गाडीचा अपघात झाल्याचे तसेच गाडीच्या शेजारी एक मृतदेह पडून असल्याचे निदर्शनास आले. मुरुम पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी आणि स्टाफ तात्काळ घटनास्थळी पोहचून मयताची ओळख पटवली. तो मयत दाळिंब ता. उमरगा येथील शमशुद्दीन मियासाहेब पटेल होता. या संदर्भात मुरूम पोलिस व स्थानिक गुन्हा शाखेने कसून तपास करून आरोपीस रात्री उशिरा पकडण्यात आले. सदर गुन्हा 48 तासाच्या आत उघडकीस आणल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोणीतरी मयतास घटनास्थळी मारहाण करुन डोक्यात दगड टाकून खुन केल्याचे दिसून आले. परंतू हा खुन कोणी केला याबाबत माहिती मिळत नव्हती. तो पर्यंत स्थानिक गुन्हे शाखेचे आधिकारी आणि स्टाफने घटनास्थळास भेट देवून गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने प्रयत्न सुरु केले होते. सदरील गुन्हा उघडकीस आणण्याकरीता परिसारातील सर्व सी.सी.टी.व्ही. तपासण्यात आले. परंतू सततचा पाउस आणि वीज पुरवठ्यामधील अनियमितता यामुळे सदरील गुन्हा उघडकीस आणणे अधिक आव्हानात्मक झाले होते. परंतु पोलीस प्रशासनाने प्रयत्नांची पराकाष्ठा करुन विपरीत परिस्थितीवर मात करीत संपुर्ण परिसर पिंजून काढला. अत्यंत कौशल्यापुर्णपणे तांत्रिक माहितीच्या विश्लेषणाच्या आधारे सदरील गुन्हा उघडकीस आणला आहे. सदरील गुन्हा दाळिंब येथीलच दोन युवकांनी मिळून केलेला आहे. त्यापैकी ज्ञानेश्वर भोळे या आरोपीस रात्री उशिरा तुगाव येथुन ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीला ताब्यात घेवून चौकशी केलीस असता त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली असुन जुन्या वैमनस्यातुन सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले आहे.
सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली सदाशिव शेलार, उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरगा, पोलिस निरीक्षक विनोद ईज्जपवार स्था.गु.शा., सपोनि. संदीप दहीफळे पो.स्टे. मुरुम, सपोनि. अमोल मोरे, सचिन खटके, पोलीस अंमलदार विनोद जानराव, बबन जाधवर, नितीन जाधवर, जावेद काझी, दयानंद गादेकर, समाधान वाघमारे, चालक विजय घुगे, सुभाष चौरे, पो.स्टे. मुरुमचा स्टाफ, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील स्टाफ यांनी संयुक्तरित्या यशस्विरित्या पुर्ण केलेली आहे.