भूम (प्रतिनिधी)-  भूम शहरातून मानाच्या पालखी व दिंड्या या आगामी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकरी दिंड्यांचा प्रमुख मार्ग असलेला सरमकुंडी फाटा ते शेंद्री फाटा हा पालखी मार्ग सध्या खड्यांनी भरलेला असून, सदर मार्ग 31 मे 2025 पूर्वी खडडेमुक्त करावा, अशी जोरदार मागणी वारकरी संप्रदायाकडून करण्यात आली आहे. अन्यथा भूम उपविभागीय कार्यालयासमोर टाळ, पखवाजासह बेमुदत अमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

या मागणीसाठी जिल्हाधिकारी, धाराशिव व उपविभागीय अधिकारी, भूम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरमकुंडी ते शेंद्री फाटा हा पालखी मार्ग असून, या मार्गाने दरवर्षी मराठवाडा आणि विदर्भातील शेकडो वारकरी दिंड्या, बैलजोड्या व अश्वरथांसह पंढरपूरकडे प्रस्थान करतात. परंतु सध्या या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे यंदा अनेक दिंड्या या मार्गावरून जाण्याच्या मानसिकतेत नाहीत. यामध्ये मुक्ताईनगर येथील मानाच्या पालखीचा देखील समावेश आहे.

हा मार्ग अन्य मार्गाने वळवला गेल्यास भूम तालुक्याच्या प्रतिष्ठेचा मोठा अपमान होईल, अशी भावना वारकरी बांधवांनी निवेदनात व्यक्त केली आहे. त्यामुळे 31 मे 2025 पर्यंत या रस्त्याची दुरुस्ती करून तो खडडेमुक्त करण्यात यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर वारकरी संप्रदायातील नागरिक, टाळपखवाज व विविध दिंड्यांचे प्रमुख यांच्यासह शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत. यासंदर्भात प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा बेमुदत उपोषणाच्या तयारीत वारकरी संप्रदाय आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.

 
Top