धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाड्याच्या हक्काच्या कृष्णा खोऱ्यातील पाण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी डिसेंबर 2025 ची नवीन डेडलाईन दिली आहे. मधल्या कालावधीत तांत्रिक अडचणींमुळे कामाला विलंब लागल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट करून 2.24 टीएमसी कृष्णा खोऱ्यातील पाणी तुळजापूर येथील रामदरा तलावात येण्याचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून, सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे. अशी माहिती मित्र चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकारांना दिली. यावेळी धाराशिव पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता विजय थोरात उपस्थित होते.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी रविवार दि. 11 मे रोजी घाटणे बॅरेज येथील भोयरे पंपगृहाची पाहणी केली. यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, सोलापूरचे नेते महेश गादेकर, कार्यकारी अभियंता अमोल नाईक, प्रविण चावरे, उपअभियंता पी. यु. मंगरूळे आदी उपस्थित होते. आमदार पाटील यांनी 90 टक्के काम झाल्याचे सांगितले. पुढील तीन महिन्यात पंप बसवण्याचे काम चालू होईल. त्यानंतर पुढील काम होईल. यामध्ये डिसेंबर अखेरपर्यंत कृष्णा खोऱ्यातील सिना नदीचे पाणी रामदरा तलावात येणार असल्याचे खात्रीलायक राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. रामदरा तलावातील पाणी तुळजापूर तालुक्यासह लोहारा व उमरगा येथे नेण्यासाठी सर्व्हे करून राज्य सरकारच्या मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया करण्यात येणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.
पहिला टप्पा 7 टीएमसीचा
कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे 25 टीएमसी पाणी आहे. त्यानंतर 21 टीएमसी पाणी जाहीर करण्यात आले. या 21 टीएमसी पैकी पहिला टप्पा 7 टीएमसीचा आहे. या 7 टीएमसी पाण्याचे काम सध्या सुरू आहे. मोहोळ तालुक्यातील कृष्णा खोऱ्यातील सिना नदीजवळ घाटणे बॅरेज मार्फत भोयरे पंपगृह ते पडसाळी, पडसाळी पपंगृह ते सावरगाव, सावरगाव पंपगृह ते पांगरदरवाडी, पांगरदरवाडी पंपगृह ते सिंदफळ, सिंदफळ पपंगृह ते रामदरा तलाव या प्रमाणे 56 किलो मीटर अंतर पार करून पाच टप्प्यामध्ये हे 2.24 टीएमसी पाणी तुळजापूर मधील रामदरा तलावात येणार आहे. त्यानंतर बंद पाईपलाईनद्वारे उपसा सिंचन पध्दतीने हे पाणी डिसेंबर 2026 पर्यंत तुळजापूर-उमरगा-लोहारा तालुक्याला मिळणार आहे. यामुळे 25 हजार 846 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.