धाराशिव (प्रतिनिधी)-बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावाला लोखंडी रॉड, कोयता व काठीने मारहाण करून खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोन दिवसानंतरही गुन्हा नोंद न केल्यामुळे नातेवाईकांनी मृतदेह पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आणला. त्यानंतर धाराशिव शहर पोलिस ठाण्यात पोक्सा अंतर्गत व खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सोमवार दि. 12 मे रोजी दोन आरोपींना न्यायालयात हजर केले असता 17 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिसरा आरोपी जखमी असून, चौथा आरोपी अल्पवयीन आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरूवार दि. 8 मे रोजी मारूती शिवाजी इटाळकर वय 18 यांच्या बहिणीची परिसरातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी छेड काढली. या प्रकरणी कारवाईची मागणी पोलिसांकडे करण्यात आली होती. पोलिसांनी काहीच कारवाई न केल्यामुळे छेडछाडीचा प्रकार वाढला होता. मारूती याने संबंधित गुंडांना जाब विचारला. तेव्हा मारूती यांना लोखंडी रॉड, कोयता, लाकडी काठीने जबर मारहाण करण्यात आली. गंभीर दुखापत झाल्यामुळे मारूती यास सोलापूर येथील रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचार चालू असताना मारूती यांचा अति रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला. रविवार दि. 11 मे रोजी सोलापूरहून मारूती यांच्या नातेवाईकांनी मृतदेह पोलिस अधीक्षक धाराशिव कार्यालयात आणला. नातेवाईकांनी संबंधित आरोपींविरोधात कारवाई कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित नातेवाईकांना आश्वासन दिल्याने मारूती यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला.