धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात रणजीत पाटील या आरोपीस पोलिसांनी अटक केली असून, धाराशिव येथील कोर्टाने 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तब्बल एक महिन्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 36 आरोपी असून, 15 जणांना अटक केली आहे. तर 21 आरोपी फरार आहेत. अटकेतील 15 पैकी 14 जण जेलमध्ये तर 1 जन पोलिस कोठडीत आहे. जिल्हा सरकारी वकील ॲड. महेंद्र देशमुख यांनी कोर्टात बाजू मांडली.

रणजीत रंगनाथ पाटील यांना गुन्ह्यात ड्रग्ज तस्कर गटात आरोपी करीत पोलिसांनी 10 हजार 744 पानाचे दोषारोपत्र दाखल केले आहे. 26 जणांवर ड्रग्ज तस्करीचा आरोप आहे. त्यात रणजीत पाटील आहेत. संगणमत करून ड्रग्जची खरेदी, विक्री, वाहतूक, साठवणूक, पैसे पुरविले. तसेच त्याचा वापर व सेवन केले. ड्रग्ज तस्करीतून बेकायदेशीर आर्थिक फायदा घेवून अवैध संपत्ती कमावली असा ठपका ठेवण्यात आला असून, एनडीपीएस कायदा 1985 चे कलम 8 (क) 21 (ब) 27, 27 (क) 29, 68 (सी) प्रमाणे दोष ठेवला आहे.

10 आरोपी यांनी ड्रग्ज विक्री करणाऱ्याकडून ड्रग्ज विकत घेवून सेवन करून कलम 27 चे उल्लघंन केल्याने त्यानुसार दोषारोप ठेवण्यात आला आहे. या 10 आरोपीचे ड्रग्ज विकत घेण्यासाठी केलेले पैशाचे व्यवहार, कॉल रेकॉर्ड, साक्षीदार यांचे जबाब व इतर पुरावे सापडले आहेत. पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना, तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश देशमुख, जिल्हा सरकारी वकील ॲड. महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. 



 
Top