धाराशिव (प्रतिनिधी)-  यंदा मे महिन्यातच जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक मान्सूनपूर्व पावसाची नोंद झाली आहे. मे महिन्यात आठ दिवस मोठा पाऊस झाला आहे. 22 मे पर्यंत जिल्ह्यात 108 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गुरूवारी 42 पैकी 7 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शेत शिवारात पाणीच पाणी साचले. तर शहर भागातील अंतर्गत रस्त्यांना तळ्यांचे स्वरूप आले होते. सलग तीन-चार दिवस काही काळ विश्रांती घेवून अवकाळी पाऊस येत असल्यामुळे नागरिकांची परेशानी झाली. 

मागील आठवड्याभरापासून शहर तसेच जिल्ह्याला पाऊस झोडपून काढत आहे. धाराशिव शहरात सलग दोन दिवस पावसाची रिपरिप सुरू आहे. ग्रामीण भागातही कमी अधिक प्रमाणात बुधवारपासून पाऊस सुरूच आहे. मान्सून दाखल होण्यास आणखी काही दिवस बाकी असतानाच यंदा मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. काही भागात अवकाळीचा जोर अधिक आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही घरांची पडझडही झाली आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात 603 मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. मे महिन्यातील पाऊस मान्सूनमध्ये गृहित धरला जात नसला तरी मे महिन्याचे सर्वसाधारण पर्जन्यमान सरासरी 25.9 मिलिमीटर आहे. मात्र यंदा  22 मेपर्यंत 108.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरात दोन दिवस झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. अंतर्गत रस्त्यांवर चिखल, खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागली. 

सात मंडळात अतिवृष्टी

गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात पडत असलेल्या अवकाळी पाऊसामुळे सात मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये धाराशिव शहर 70.8 मिमी, बेंबळी 69.5 मिमी, पाडोळी 69.5 मिमी, उमरगा 68.8 मिमी, केशेगाव 69.5 मिमी, मुळज 68.8 मिमी, माकणी 81.0 मिमी पाऊस झाला आहे. गेल्या तीन वर्षापेक्षा प्रथमच मे मध्ये एकूण सरासरी 108.1 मिमी जास्त पाऊस झाला आहे. 


 
Top