भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातील शासकीय विश्रामगृह, पारडी रोड येथे सार्वजनिक बांधकाम उपविभाग भूम व भूम पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने रस्ते सुरक्षा अभियान आयोजित करण्यात आले. यावेळी रस्ते सुरक्षेचे महत्त्व पटवून देत उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण केली.

या अभियानाचे आयोजन सार्वजनिक बांधकाम मंडळ, धाराशिव व बांधकाम विभाग धाराशिव यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. अपघातमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी रस्ते सुरक्षा ही काळाची गरज असल्याचे सर्व वक्त्यांनी नमूद केले.

रस्ते अपघात हे आपल्या समाजातील एक गंभीर व दुर्दैवी वास्तव बनले असून, यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र राज्य हे सन 2024 मध्ये देशात अपघाताच्या संख्येत पाचव्या क्रमांकावर असून, 36084 अपघातांमध्ये 15335 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः तरुण वयोगटातील नागरिक या अपघातांचे बळी ठरत असल्याची गंभीर बाब अधोरेखित करण्यात आली.

रस्ते सुरक्षा अभियानामध्ये अपघात होण्यामागची कारणे, वाहतुकीचे नियम, हेल्मेट वापराचे महत्त्व, सीट बेल्टचा वापर, मद्यपान करून वाहन चालवण्याचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. “वेगाने रोमांच येतो, पण मारून टाकतो” या घोषवाक्याद्वारे वेगाच्या मोहात पडू नये, हा संदेशही देण्यात आला. या कार्यक्रमाला बांधकाम अधिकारी आर. आर. गिरम, भूम पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत तवार, पोलीस उपनिरीक्षक संजय झराड, वाय. जी. यादव, अरविंद डोके तसेच बांधकाम विभाग भूमचे अधिकारी बी. आर. खुणे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना रस्ते सुरक्षा संदर्भातील पुस्तिका वाटप करण्यात आली व सुरक्षित वाहतुकीसाठी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.


 
Top