धाराशिव (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अर्थात आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना हया योजना रुग्णांना लाभ घेण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण आहे.जिल्हयातील रुग्णांना विविध आजारावरील उपचार व शस्त्रक्रियांसाठी पैसे खर्च करण्याची वेळ येवु नये यासाठी आयुष्मान भारत योजनेचा लाभ शेवटच्या घटकाला मिळाला पाहिजे. असे मत आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिरात फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत कार्ड वितरणाचा आढावा घेतांना डॉ.शेटे बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चाकुरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरीदास, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती साकळे यांची प्रमुख उपस्थिती होते.
डॉ.शेटे म्हणाले की,जिल्हयातील जे रुग्णालये या योजनेअंतर्गत येत नाही परंतु त्यांच्याकडे रुग्णांना देण्यासाठी निकषानुसार सुविधा आहेत,त्यांना पण या योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल. रुग्णांचा जीव वाचविणे हे काम महत्वाचे असून,ज्या रुग्णालयात रुग्ण भरती आहे त्या रुग्णालयाला देखील या योजनेचा तसेच वयोवृध्द व्यक्तीना प्राधान्याने या योजनेचा तसेच लाभ देण्यात येईल.या योजनेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी रुग्णांना चांगल्या प्रकारे आरोग्य सेवेचा लाभ दयावा असे डॉ.शेटे यावेळी म्हणाले.
जिल्हाधिकारी पुजार म्हणाले की, जिल्हयातील जास्तात जास्त रुग्णांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हयातील सर्व खाजगी रुग्णालयांना या योजनेची माहिती देण्यात येईल.
पाच वर्षात143 कोटी 32 लाख रुपये सहाय्य
जिल्ह्यात या योजनेअंतर्गत नोंदणीकृत शासकीय 12 आणि 19 खाजगी रुग्णालये आहेत 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2025 या कालावधीत जिल्ह्यातील 71 हजार 843 रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून उपचाराच्या दाव्यापोटी 143 कोटी 32 लक्ष 33 हजार रुपये राज्यातील विविध रुग्णालयांना अदा केले तर 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2025 दरम्यान जिल्ह्यातील अंगीकृत रुग्णालयात 20 हजार 741 रुग्णांनी उपचार घेतले.या उपचाराच्या दाव्यापोटी 9 कोटी 13 लाख रुपये रुग्णालयांना अदा केले.जिल्ह्यात मार्च 2025 अखेर 3 लक्ष 86 हजार 499 कार्ड वाटप करण्यात आल्याची माहिती योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ आहेर यांनी सादरीकरणातून यावेळी दिली. या सभेला योजनेत नोंदणीकृत असलेले जिल्ह्यातील 14 खाजगी रुग्णालयाचे प्रतिनिधी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.