उमरगा (प्रतिनिधी)- शहरातील एका बांधकाम व्यावसायिकावर दि. 15 एप्रिल रोजी दिवसाढवळ्या भर दुपारी पावणे तीन ते चार वाजण्याच्यासुमारास झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणातील तीन आरोपींना उमरगा पोलिसांनी 24 तासांच्या आत जेरबंद करुन त्यावर न थांबता तपासाची चक्रे तीव्र करत दि.20 एप्रिल रोजी आंध्र प्रदेश राज्यातील हुमनाबाद येथे दुपारी चौथा आरोपी जेरबंद करुन मोकळा श्वास घेतला.उमरगा पोलीस सदैव सतर्क असून तालुक्यातील तसेच शहरातील जनतेने अफवावर विश्वास न ठेवता कोणत्याही घटनेची चाहुल लागल्यास तात्काळ उमरगा पोलीसांना संपर्क करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी तालुकावाशीयांना केले आहे.
दि 15 एप्रिल रोजी जो बांधकाम व्यवसायिक गोविंद दंडगुले यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला तो जुन्या आर्थिक वादातून हल्ला झाल्याचे समोर आले आहे. उमरगा पोलीसांनी तीन आरोपींना घटना घडल्यापासुन च्या वेळेपासून 24 तासाच्या आत
कर्नाटकातून ताब्यात घेतले. जो एका फरार आरोपी होता त्यास आंध्र प्रदेश राज्यातील हुमनाबाद येथे दि.20 एप्रिल रोजी दुपारी जेरबंद केले.जखमी गुत्तेदारावर सोलापूर येथे उपचार सुरू आहे.
हा हल्ला 15 एप्रिलला दुपारी पावणेतीनच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील मारुती सुझुकी शो-रुमसमोर घडला होता. बांधकाम गुत्तेदार गोविंद राम दंडगुले (40) स्कूटीवरून घराकडे जाताना, नंबर प्लेट नसलेल्या सिल्व्हर रंगाच्या इर्टिगा कारमधून आलेल्या तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी स्कूटी अडवून धारदार शस्त्रांनी त्यांचे डोके व हातावर गंभीर वार करून हल्लेखोर कारमधून पसार झाले होते. नागरिकांनी गंभीर जखमी दंडगुले यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारास सोलापूर येथील खासगी रुग्णालयात हलवले होते. सध्या दंडगुले यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अंमलदार पोहेकॉ अतुल जाधव यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोनि श्रीकांत भराटे करत आहेत. आरोपी राहुल रमाकांत परशेट्टी (रा. मुळज), शिवा कुकुर्डे (रा. कुन्हाळी), प्रदिप कलशेट्टी (जुनीपेठ उमरगा) व फरार असलेला आरोपी व दि. 20 एप्रिल रोजी जेरबंद करण्यात आलेला नवतेज तोरणे (रा. काळे प्लॉट उमरगा) यांनी जखमीवर घातक शस्त्राने हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. अटकेतील राहुल परशेट्टी याच्याकडून गुन्ह्यातील मारहाण केलेले तीन लोखंडी कोयते, आरोपींनी वापरलेली सिल्व्हर रंगाची इर्टीगा कार शासकीय पंचांसमक्ष जप्त केली. फरार आरोपी नवतेज तोरणे यास दि. 20 एप्रिल रोजी जेरबंद करण्यात आले
तीन आरोपींना शनिवारी (दि.19) न्यायालयासमोर हजर केले असता शुक्रवारपर्यंत (दि.25) पोलिस कोठडी सुनावली.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अश्विनी भोसले, सपोनि पांडुरंग कन्हेरे, पोउपनि गंगाधर पुजरवाड, सपोफौ प्रदिप ओव्हळ, पोहेको चैतन्य कोगुलवार, पोहेका विशाल कांबळे, पोना यासिन सय्यद, पोना अनुरुद्ध कावळे, पोकों नवनाथ भोरे यांच्या पथकाने केली आहे.