धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील येडशी येथे कौटुंबिक व आर्थिक वादातून चुलत्याचा तलवारीने तुकडे करून खून करणाऱ्या पुतण्याला मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांनी जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे. यातील दुसरा आरोपी मृताचा भाऊ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त झाला आहे. 2018 मध्ये झालेल्या या खुनामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
सहाय्यक शासकीय अभियोक्ता ॲड. पंडित के. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार येडशी येथे दि. 7 नोव्हेंबर 2015 रोजी मध्यरात्री खून झाला होता. भास्कर रंगनाथ नागटिळक (60) यांच्या घरी त्यांचा पुतण्या महेंद्र वामन नागटिळक अचानक आला. त्याने भास्कर यांना घरातून बाहेर आणले. नंतर भास्कर यांचा तलवारीने वार करून खून केला. रात्र असल्यामुळे भास्कर यांच्या पत्नीने आतून दरवाजा लावलेला असताना लाथा मारून दरवाजा उघडला आणि पत्नीला मारहाण करून रामलिंग अभयारण्यात नेऊन तिला तारेने झाडाला बांधून टाकले. खून करण्यासाठी मला सोमनाथ नागटिळक याने सुपारी दिली आहे असे म्हणत महेंद्र याने मृतदेह जंगलात नेवून गायब केला. तसेच पुन्हा पत्नीला सोडून दिले आणि तू थेट माहेरी जायचे. आणि हा प्रकार कोणाला सांगितलास तर तुला व तुझ्या मुलास जीवे मारून टाकीन, अशी धमकीही दिली. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
शिवविच्छेदन करणारे डॉक्टर, संबंधित अन्य कुटुंबीय असे मिळून एकूण 18 जणांची साक्ष नोंदवण्यात आली. याप्रकरणी महेंद्र यांच्या विरोधात सबख पुरावा प्राप्त झाल्यामुळे जिल्हा व सत्र न्यायाशीश खटी यांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच खुनाची सुपारी देणारा बंधू सोमनाथ रंगनाथ नागटिळक यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नसल्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणी अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पंडित जाधव यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली.