धाराशिव (प्रतिनिधी) - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची देशाच्या अर्थकारण शिक्षण सर्व क्षेत्रावर छाप आहे. शासन जे उपक्रम राबवित आहे त्याचा जन्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा आहे. बाबासाहेबांनी दूरदृष्टीचा विचार करून अतिशय मेहनतीने भारतीय संविधान तयार केले. त्यामध्ये सर्व जाती घटकांचा विचार केला असून त्यांच्यामुळेच सर्वसामान्य घरातील बिरुदेव डोणे हे युपीएससी परीक्षेच्या माध्यमातून आयपीएस अधिकारी होऊ शकले असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी दि.27 एप्रिल रोजी केले. दरम्यान, विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय सामाजिक कामगिरी करणाऱ्या विश्वनाथ शिवमूर्ती तोडकर, प्रवीण तानाजीराव बागल, पंकज संभाजीराव काटे, कैलास चिंतामणराव शिंदे, राजेंद्र निकाळजे, प्रा.डॉ.सतिश सुखदेव कदम, एस.के.चेले, हरीश डावरे, दादासाहेब जेटीथोर, ॲड. खंडेराव चौरे, संजय कोंडीबा बनसोडे, गौरी राजेश शिंदे, गुणवंत दगडू सोनवणे व धनंजय रोहिदास वाघमारे यांचा समाजरत्न पुरस्काराने येथोचित  सन्मान करण्यात आला. तसेच शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा देखील समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव शहरातून डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक प्रारंभापूर्वी आयोजित समाज रत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक धनंजय नाना शिंगाडे उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद घुले,ॲड.परवेज काझी,विश्वास शिंदे,डॉ.स्नेहा सोनकाटे,चंद्रजीत जाधव,कोषाध्यक्ष विशाल शिंगाडे, कार्याध्यक्ष संजय मुंडे, खलील सय्यद, रविंद्र सुर्यवंशी, पाडूरंग भोसले,नाना घाटगे,इलियास मुजावर,अर्जुन पवार, प्रसेंजीत शिंगाडे, सारिपुत शिंगाडे, रवि कोरे आळणीकर, इंद्रजित देवकते, सतिश कदम, लक्ष्मण माने, अनिरुद्ध कावळे,बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांचेसह आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना जिल्हाधिकारी पुजार म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लोककल्याणाचा अंतर्भाव संविधानामध्ये केलेला आहे त्यामुळे सर्वांनी लोक कल्याणाची कामे केली पाहिजेत. तसेच त्यांनीच अभिव्यक्ती स्वातंत्र्यसह मूलभूत अधिकार सर्वांना दिलेले आहेत. त्याचे जन्मदाते हे आंबेडकर असून संविधानाची माहिती प्रत्येकांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यासाठी संविधानाची प्रत सर्वांना उपलब्ध उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तर धनंजय शिंगाडे म्हणाले की, गेल्या 31 वर्षांपासून सर्व समुदायाला सोबत घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. आजपर्यंत सर्व धर्मांच्या लोकांना अध्यक्षपदाचा मान देणारी ही महाराष्ट्रातील एकमेव संघटना आहे.त्यामुळे तरुणासह सर्वांनीच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुकरण करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सक्षणा सलगर यांनीही आपले विचार  व्यक्त केले. भिमनगर येथून प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सायंकाळी मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीच्या सुरुवातीला असलेल्या सजवलेल्या रथात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी सर्व महापुरूषांच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर मिरवणुकीला शिस्तबद्ध पद्धतीने सुरुवात करण्यात आली. यावेळी 120 सदस्यांचा समावेश असलेले गजाढोल पथक मिरवणुकीचा आकर्षणाचा केंद्रबिंदू बसने होते. यावेळी ढोल घेऊन नाचणाऱ्यांनी उत्कृष्ठ पदलालित्य दाखवत केलेले नृत्य प्रत्येकांना भुरळ पाडत होते. ढोलाच्या तालावर अनेकांनी ताल धरत बेभान होऊन नृत्य केले.  


पारंपरिक बँड पथकांचा नजराना

केरळ राज्य, कोल्हापूर, सांगली व अन्य जिल्ह्यातील पारंपरिक वाद्य पथक, बँड पथकही मिरवणुकीत सहभागी करण्यात आले होते. यांचीही कला एकत्रितपणे धाराशिवकरांना प्रथमच अनुभवता आली. आपल्या वेगळ्या शैलित त्यांनी केलेले सादरीकरण सर्वांच्या टाळ्या मिळवत होते. यामध्ये तुळजाभवानी मातेचे संबळ पथकही आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले होते. नागरिकांनी यामध्ये उत्सफुर्त सहभाग नोंदवला. 



सळसळत्या उत्साहासह युवक, युवतींचा सहभाग

मिरवणूक भीम नगर, त्रिशरण चौक, पोष्ट ऑफिस, काळा मारुती चौक या मार्गावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर चौकपर्यंत नेण्यात आली.  येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी सळसळत्या उत्साहासह युवक व युवती मिरवणूकीत सहभागी झाले होते. त्यांनीही प्रत्येक ढोल, व वाद्यांच्या तालावर ठेका धरला होता. मिरवणुकीत ठिकठिकाणी पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामीण भागातून आलेले नागरिकही यामध्ये सहभागी झाले होते.


 
Top