उमरगा (प्रतिनिधी)-तालुक्यातील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माजी मंत्री बसवराज पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमनपदी सादिकसाहेब काझी यांची निवड करण्यात आली आहे.
मुरुम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध पार झाली आहे. कारखान्याचे सर्व 21 संचालक बिनविरोध निवडुन आल्यानंतर चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाच्या निवडीसाठी कारखाना कार्यस्थळावर मंगळवारी दि.22 एप्रिल रोजी कारखाना कार्यस्थळावर बैठक पार पडली. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणुन जिल्हा उपनिबंधक पांडूरंग साठे यांनी काम पाहिले. चेअरमन पदासाठी माजी मंत्री बसवराज पाटील यांचे नांव रामकृष्णपंत खरोसेकर यांनी सुचवले. त्यास केशवराव पवार यांनी अनुमोदन दिले. तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी सादिकसाहेब काझी यांचे नांव शरणप्पा पत्रिके यांनी सुचवले. त्यास माणिकराव राठोड यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदासाठी सभेत एक एकच नांव सुचविल्याने अध्यासी अधिकारी यांनी चेअरमन पदासाठी बसवराज पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदासाठी सादिकसाहेब काझी यांची बिनविरोध एकमताने निवड झाल्याचे जाहीर केले. सभेस नवनिर्वाचित संचालक बापुराव पाटील, शरण बसवराज पाटील, विठ्ठलराव पाटील, संजय बिराजदार, दिलीप पाटील, ॲड. सुभाषराव राजोळे, विठ्ठलराव बदोले, राजीव हेबळे, संगमेश्वर घाळे, शब्बीर जमादार, शिवलिंगप्पा माळी, शिवमुर्ती भांडेकर, दिलीप भालेराव, सौ. इरम्माताई स्वामी, श्रीमती मंगलताई गरड व कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. आर. गवसाणे उपस्थित होते.
आपल्या कारखान्याचे प्रति दिनी 30 हजार लिटर डिस्टलरी/इथेनॉल प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असुन लवकरच प्रकल्प उभारणीच्या कामास सुरूवात होणार आहे. यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रिय सहकार मंत्री अमीत शहा व आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फार मोठे सहाय्य आपल्याला मिळाले आहे अशी माहिती चेअरमन पाटील यांनी दिली.