धाराशिव (प्रतिनिधी)-गेल्या दोन दिवसापासून शहरातील कचरा डेपो बाहेर हलवा, त्याचप्रमाणे शहरातील विकास कामावरील स्थगिती उठवा या मागणीसाठी गेल्या दोन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव समोर महाविकास आघाडीच्यावतीने सोमनाथ गुरव, रवि वाघमारे आणि सरफराज काझी आमरण उपोषणाला बसले होते. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दि. 30 एप्रिल रोजी दुपारी भेट देवून कचरा डेपो तत्काळ शहराबाहेर हलविला जाईल व मंजूर असलेल्या विकास कामावरील स्थगिती उठविली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर पालकमंत्री यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सक्षणा सलगर उपस्थित होते.
काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी तुळजापूरच्या लोकप्रतिनिधीचे धाराशिव मतदारसंघात काय काम? असा प्रश्न उपस्थितीत करून धाराशिव शहरातील विकास कामांना कोण अडथळे आणत आहे. रस्त्याच्या कामाची निविदा 9 महिन्यापासून का उघडली नाही. मंजूर असलेले 140 कोटी रूपयांच्या रस्त्याचे कामे का चालू केले जात नाही. आदी प्रश्न पालकमंत्र्यांना विचारले. त्याचप्रमाणे शहराच्या मध्यवस्तीमध्ये आलेला कचरा डेपो त्वरीत हलवा अशी मागणी केली. यावेळी पालकमंत्री सरनाईक यांनी मागे जे झाले ते आता काढू नका. उद्या डीपीडीसीची बैठक आहे. त्या बैठकीत कचरा डेपो हलविण्याबाबत निर्णय घेतला जाईल व कचऱ्यापासून खत बनविण्यासाठी जागेसह विशेष तरतूद केली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, जिल्हा संघटक सुधीर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे, संपर्कप्रमुख नितीन लांडगे माजी नगरसेवक प्रदिप मुंडे, रवि वाघमारे, उमेश राजेनिंबाळकर, पंकज पाटील, पांडूरंग भोसले, संकेत सुर्यवंशी, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
कचरा पेटवला
पालकमंत्री उपोषणस्थळी येणाऱ्यापुर्वी कचरा डेपोमधून एक ट्रॅक्टर कचरा भरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाकण्यात आला. त्यानंतर तो कचरा पेटवला. त्यामुळे जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे पोलिस विभागाने तातडीने अग्निशामन दलाची गाडी मागवून पेटलेला कचरा विझविला.