भूम (प्रतिनिधी)- बिहार येथे पार पडलेल्या 34 व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भूम येथील विश्वजीत अमर सुपेकर याचे शहरात आगमन होताच स्वराज्य क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणानिमित्त भूम शहरात आनंदाचे वातावरण पसरले होते. शहरातील विविध चौकांमध्ये मिरवणूक काढण्यात आली आणि ठिकठिकाणी त्याचा सत्कार करण्यात आला.

विश्वजीत सुपेकरच्या स्वागतासाठी भूमकरांनी मोठ्या जल्लोषाने आणि उत्साहाने त्याचा गौरव केला. शहरातील मुख्यगोलाई ते ओमकार मार्ग आणि नागोबा चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत भूमकरांनी आपल्या युवा खेळाडूचे जोरदार स्वागत केले. यावेळी स्थानिक नागरिक, क्रीडा प्रेमी आणि विविध संस्था मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

मेहनतीच्या जोरावर विश्वजीत सुपेकर हा गेल्या काही वर्षांपासून कबड्डी खेळात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहे. जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्याने आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या मेहनतीला आणि खेळातील कौशल्याला मान्यता मिळाली आणि त्याला महाराष्ट्र संघात स्थान मिळाले. याशिवाय, भूममधील यशोदीप कांबळे यांनीही मागील वर्षी महाराष्ट्र संघात स्थान मिळवले होते. तसेच, साहिल जरडकर आणि सुहास बाबर यांनी 19 वर्षाखालील महाराष्ट्र राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला आहे. या सर्व खेळाडूंना स्वराज्य क्रीडा मंडळाचे व नॅशनल कोच अमर सुपेकर यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले आहे.

क्रीडा प्रेमींकडून कौतुक आणि शुभेच्छा भूम शहरातील क्रीडा प्रेमींनी आणि विविध संस्थांनी विश्वजीतचे अभिनंदन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्थानिक प्रशासकीय अधिकारी, प्रशिक्षक आणि खेळाडूंनी त्याच्या भविष्यातील यशासाठी प्रोत्साहन दिले. त्याच्या या यशामुळे भूममधील युवा खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे.

भूमसाठी अभिमानाची बाब विश्वजीत सुपेकरने केलेली कामगिरी ही भूम शहरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्याच्या यशामुळे भूमचे नाव राष्ट्रीय स्तरावर गाजले असून, भविष्यात तो अधिक मोठ्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करेल अशी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे. त्याने राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत भूमचे नाव उज्ज्वल करावे, हीच भूमकरांची इच्छा आहे.

 
Top