धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यातील वय वर्षे 65 व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविली जात आहे.या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना चष्मा,श्रवणयंत्र,ट्रायपॉड, स्टिक,व्हीलचेअर,फोल्डिंग वॉकर,कमोड खुर्ची,नी-ब्रेस,लंबर बेल्ट व सर्वाइकल कॉलर यांसारखी सहाय्य साधने खरेदी करण्यासाठी एकरकमी 3000 रुपये मर्यादेपर्यंतचा निधी वितरीत केला जातो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे वय दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी 65 वर्ष पूर्ण झालेले असावे व कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात या योजनेत पात्र ठरलेल्या 17 हजार 975 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या खात्यात निधी जमा करण्यात अडचणी येत आहेत.त्यामुळे 30 एप्रिलपर्यंत विशेष आधार प्रमाणीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केला असून अद्याप निधी प्राप्त झालेला नाही,त्यांनी वरील कालावधीत कार्यालयीन वेळेत सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,धाराशिव यांच्या कार्यालयात उपस्थित राहावे,असे आवाहन सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.