धाराशिव (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.6 महिने कार्यप्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा कालावधी आणखी 5 महिन्यांनी वाढवण्यात आला असून,एकूण कार्यप्रशिक्षणाचा कालावधी आता 11 महिने करण्यात आला आहे.
ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी 10 मार्च 2025 पर्यंत 6 महिने कार्यप्रशिक्षण पूर्ण केले आहे,त्यांना पुढील 5 महिन्यांसाठी मुदतवाढ दिली जाणार आहे.तसेच,ज्यांचा 6 महिन्यांचा कालावधी अद्याप पूर्ण झालेला नाही, त्यांचा एकूण प्रशिक्षण कालावधी आस्थापनेत रुजू झालेल्या दिनांकापासून 11 महिने राहणार आहे.
प्रशिक्षणार्थ्यांनी <http://cmykpy.mahaswayam.gov.in/> (CMYKPY) संकेतस्थळावर ‘Intern Login’ मधून आधार पडताळणी करून अर्ज डाउनलोड करावा व तो दिनांक 30 एप्रिल 2025 पर्यंत ज्या कार्यालयात कार्यरत आहेत तेथे सादर करून रुजू व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
शासकीय व खाजगी आस्थापनांनी देखील 6 महिने कार्यप्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांची आधार पडताळणी सुनिश्चित करून त्यांना नियुक्ती आदेश देऊन 30 एप्रिल 2025 पूर्वी रुजू करून घ्यावे,अशी सूचना देण्यात आली आहे.तांत्रिक अडचणींच्या बाबतीत जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव कार्यालयाशी संपर्क साधावा,असे सहाय्यक आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे.