मुरूम, (प्रतिनिधी) -डॉ. आंबेडकर यांनी सामाजिक समता, आर्थिक न्याय आणि बौद्धिक स्वातंत्र्य या तत्त्वांवर आधारलेला भारत घडविण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांचा विश्वास होता की, प्रत्येक नागरिकाला शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि आत्मसन्मान मिळालाच पाहिजे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी घटनेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळावेत, यासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या. जातीभेद, अस्पृश्यता आणि भेदभाव नष्ट व्हावा, हा त्यांचा प्रमुख हेतू होता. समतेवर आधारित नवभारताची उभारणी होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केले. भीम नगर, मुरूम ता. उमरगा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित बुधवारी (ता. २३) रोजी व्याख्यानाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठवाडा साहित्य परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रा. किरण सगर होते. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, संभाजीनगरचे प्रा. डॉ. मिलिंद वाहुळे, प्रा. स्वाती कांबळे, पाशा कोतवाल, फिनिक्स सगर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. पुढे बोलताना डॉ. कांबळे म्हणाले की,  शिक्षण हाच खरा मुक्तीचा मार्ग आणि समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन असून " शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा " हा त्यांचा मंत्र आजही लाखो तरुणांसाठी मार्गदर्शक ठरतो आहे. आज भारतात अनेक क्षेत्रांत प्रगती झाली असली, अजूनही सामाजिक विषमता, बेरोजगारी आणि शिक्षणातील असमानता या बाबतीत सुधारणा आवश्यक आहेत. बाबासाहेबांच्या विचारांना कृतीत आणणे हेच त्यांना खरी आदरांजली ठरेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपल्या परीने सामाजिक समतेसाठी प्रयत्न केला पाहिजे. अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्रा. किरण सगर की, बाबासाहेबांनी जी राज्यघटना बनवली ती सर्वसमावेशक सर्वोत्कृष्ट असून तो आपला लोककल्याणकारी आदर्श ग्रंथ आहे. संविधानामुळेच माणूस माणसात आला.  त्याला सर्व प्रकारचे हक्क मिळून कर्तव्याची जाणीव झाली. या भारू संविधानाचे पावित्र्य राखणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. प्रा. डॉ. महेश मोटे यांनी मनोगत व्यक्त केले. आशिष नाईकवाडे, गौतम गायकवाड, राहुल गायकवाड, राष्ट्रगीत कांबळे, सहील गायकवाड, आकाश बनसोडे, रोहन कांबळे, वैशाली बनसोडे, प्रज्ञा कांबळे आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन संतोष कांबळे तर आभार प्रा. महेश कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमाला शहर व परिसरातील आंबेडकरप्रेमी नागरिक उपस्थित होते. 

 
Top