भूम (प्रतिनिधी)- वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाची रचना व आर्थिक तरतुदीबाबत कार्यवाही सुरू असून लवकरच राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठीचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ कार्यरत करू असे आश्वासन राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले. वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे मार्गदर्शक ठाणे येथील आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्री फुंडकर यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी फुंडकर यांनी हे आश्वासन दिले.
या शिष्ठमंडळात राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर वर्धा, कार्याध्यक्ष बालाजी पवार नांदेड, सरचिटणीस विकास सूर्यवंशी सांगली, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार बुलढाणा व व्यवस्थापन समिती सदस्य दत्तात्रय घाडगे ठाणे यांचा सहभाग होता. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठीचे कल्याणकारी मंडळ लवकरात लवकर कार्यरत करावे. या मंडळासाठी लागणारा निधी उभा करण्याचे मार्ग राज्य शासनाने नेमलेल्या अभ्यास समितीने सुचवलेले आहेत. 2019 मध्ये या अभ्यास समितीने आपला अहवाल राज्य शासनास दिला असून त्यातील सुचवलेल्या मार्गापैकी काही मार्गांचा अवलंब करून निधीचा स्त्रोत नक्की करावा. त्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी पेन्शन, व्यवसायासाठी मदत, व्यवसायासाठी साधनसामग्रीची पुरवठा, आरोग्य सुविधा, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी योजना आदी योजना लागू कराव्यात.अशी विनंती आमदार केळकर यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्यावतीने कामगार मंत्र्यांच्या केली. राज्य संघटनेचे अध्यक्ष श्रपाटणकर, कार्याध्यक्ष पवार, सरचिटणीस सूर्यवंशी, कोषाध्यक्ष श्री टिकार व सदस्य घाडगे यांनीही यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.