धाराशिव (प्रतिनिधी)- दरवर्षी ८ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह" साजरा करण्यात येतो. या सप्ताहाचे आयोजन अनूसूचित जाती,अनुसूचित जमाती आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी तसेच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी करण्यात येते.
या सप्ताहानिमित्त,जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.शाळा,महाविद्यालये व शासकीय वसतिगृहांमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व,निबंध व लघुनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.ग्रामीण व शहरी भागांमध्ये समतादूतांमार्फत पथनाट्य व लघुनाटिकांद्वारे जनजागृती करण्यात आली.
मार्जिन मनी योजनेंतर्गत कार्यशाळा, महात्मा फुले यांच्या कार्यावर व्याख्याने,संविधान जागर कार्यक्रमात संविधान निर्मिती,समिती,अनुच्छेद, मुलभूत अधिकार व कर्तव्यांवर माहितीपर व्याख्याने घेण्यात आली.तसेच,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी व शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्यावर विशेष व्याख्याने आयोजित करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबीर व मेळावे घेण्यात आले. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली,तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावाही घेण्यात आला.
१४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करताना,कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेचे वाचन करून महामानव डॉ.आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समता सप्ताहाचा समारोप करण्यात आला.