धाराशिव (प्रतिनिधी)- सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आणि तातडीने तज्ञांच्या निगराणीखाली उपचार उपलब्ध व्हावे, यासाठी आपण मोठा पाठपुरावा करून हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले आहे. मात्र त्याठिकाणी रुग्णांना दिलासा देण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी बांधवांना काही समाजकंटक वेठीस धरत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात तातडीने पोलिसांचे पथक तैनात करून आरोग्य कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आपण दिल्या होत्या. त्यानुसार आता सहा पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले असून याउपरही कोणाला जाणीवपूर्वक त्रास दिला गेल्यास आपल्या निदर्शनास आणून द्यावे. असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
समाजकंटकाकडून त्रास होत असल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसराला 8 मार्च रोजी भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, रुग्ण तसेच रुग्णांचे नातेवाईक यांना जर कोणी नाहक त्रास देत असेल तर आपण हे कदापि सहन करणार नाही अशा शब्दात त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांना सुनावले होते. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात उपद्रव माजविणाऱ्या समाजकंटकांचा तात्काळ कायदेशीर मार्गाने बंदोबस्त व्हायलाच हवा अशा शब्दात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलासा देत समाजकंटकांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे पोलीस प्रशासनाला निर्देश दिले होते. रुग्णालय परिसर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपद्रव माजविणाऱ्या या समाजकंटकांवर तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर पोलीस प्रशासन आता कामाला लागले आहे.