धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्याचे वैभव असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या कवड्याची माळ आणि जिल्ह्याची वेगळी ओळख असलेल्या कुंथलगिरिच्या खव्यावर आणि जिल्ह्याचे पर्यटन यावर आधारित विविध कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा प्रयत्न आहे. तसेच धाराशिव येथील विद्यापीठ उपकेंद्रात प्री - आयएएस, आयपीएस स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र आणि फॉरेन लँग्वेज कोर्सेस सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू असल्याची माहिती सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी दिली.

यावेळी विद्यापीठ उपकेंद्रातील क्रीडांगणासह मुलांचे वस्तीगृह आणि विद्यापीठ उप परिसरासाठी या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात आली. त्याला सिनेट सभागृहाने मंजुरी देखील दिली. महाराष्ट्र स्टेट किल स्किल डेव्हलपमेंट सोसायटी आणि स्किल युनिव्हर्सिटी यांच्यासोबत श्री तुळजाभवानी मातेची कवड्याची माळ, कुंथलगिरीचा खवा व जिल्ह्याचे पर्यटन याबाबत सामंजस्य कराराची प्रक्रिया सुरू असून आगामी शैक्षणिक वर्षापासून हे नवीन कोर्स सुरू करण्याचे प्रयत्न असल्याची माहिती विद्यापीठाच्या वतीने देण्यात आली आहे.


प्राचार्य वेदालंकार यांचे साहित्य प्रसिध्द करणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सन 2025- 26 चा अर्थसंकल्प मंजूर करण्यासंदर्भात 15 मार्च रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय सिनेट बैठकीत धाराशिव इथल्या विद्यापीठ उपकेंद्रासाठी संचालकांना खर्चाचे एक लाख रुपयांचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यापीठ उपकेंद्राने धाराशिव येथील ज्येष्ठ साहित्यिक, माजी प्राचार्य वेदकुमार वेदालंकार यांना नुकताच जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यांचे अप्रकाशित आणि हिंदी अनुवादित साहित्य विद्यापीठाच्या माध्यमातून प्रकाशित करण्याचा मनोदयही यावेळी विद्यापीठाने व्यक्त केला आहे. या संदर्भात सिनेट सदस्य नाना गोडबोले, देविदास पाठक यांनी सभागृहात विषय उपस्थित केला.

 
Top