धाराशिव ( प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2023 24 या वर्षातील पदवी वितरण समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 21 मार्च 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता संपन्न झाला.

सदर कार्यक्रमासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री कौस्तुभ गावडे यांनी आपले विचार व्यक्त करताना सध्याचे युग हे खूपच गतिमान आहे. या गतिमान युगात आपणाला आपले अस्तित्व सिद्ध करावयाचे असेल तर अभ्यासाने व्यक्त होण्याची गरज आहे असे ते यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामुळे आपल्या नोकरीवर कसल्याही स्वरूपाची गदा येणार नाही.किंवा यामुळे बेरोजगारी निर्माण होणार नाही.तर गुणवत्ता पूर्ण उत्पादन तयार करेल यासाठी तुम्ही या बदलत्या काळाबरोबर एकरूप होणे गरजेचे आहे.

सर्वप्रथम सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी केले.यावेळी डॉ. देशमुख म्हणाले की, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय हे विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करते . त्यामुळे रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यापीठांमध्ये सलग पाच वर्ष सुवर्णपदक मिळवत आहेत. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी घेतलेल्या कष्टामुळे आणि येथे सुरू केलेल्या महाविद्यालयामुळे माझ्यासह अनेक विद्यार्थी या महाविद्यालयाने मोठे केले आहेत. महाविद्यालयाशिवाय आम्ही शिक्षणापासून वंचित राहिलो असतो असेही ते यावेळी म्हणाले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य आणि महाविद्यालयाचे पहिले माजी विद्यार्थी माजी नगरसेवक श्री नानासाहेब पाटील हे होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री पाटील म्हणाले की रामकृष्ण परमहंस महाविद्यालय हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पहिले महाविद्यालय आहे त्यामुळे या महाविद्यालयाकडे संस्थेचे विशेष असे लक्ष आहे.त्यामुळेच आज हे महाविद्यालय प्रगतीपथावर असल्याचे दिसते.

याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.यासाठी परीक्षा विभाग प्रमुख प्राध्यापक माधव उगिले यांनी परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाचे प्रा.डॉ.अरविंद हंगरगेकर यांनी केले तर आभार प्रा.डॉ.सावता फुलसागर यांनी मानले. यावेळी  भाषा ,विज्ञान, सामाजिक शास्त्रे,आणि वाणिज्य या चार शाखेतील विभाग प्रमुख महाविद्यालयीन स्तरावर अधिष्ठाता म्हणून उपस्थित होते. यामध्ये डॉ. संदीप देशमुख, डॉ.छाया दापके , श्रीमती स्वाती बैनवाड, श्री बालाजी नगरे उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

 
Top