भूम (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद हायस्कूल भूम येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला .कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी दररोज मुलांना शालेय पोषण आहार खाऊ घालणाऱ्या सौ . रूपाली माने होत्या . प्रसिद्ध लेखिका गदिमा पुरस्कार प्राप्त प्रा .सौ अलका सपकाळ ,आपल्या पतीच्या संसारामध्ये खांद्याला खांदा लावून इस्त्रीचा लघु उद्योग करणाऱ्या लता शिंदे ,आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र कष्ट करून भाऊ नसला तरी आई-वडिलांना त्याची उणीव भासू नये ; लहान बहिणीचे शिक्षण पूर्ण करता यावे या उद्देशाने जिद्दीने अभ्यास करून केवळ एक जागा असताना त्या एका जागेवर आपले नाव कोरून पोलीस भरती होऊन लातूर येथे प्रशिक्षण घेत असलेली आणि खेळामध्ये पोलीस विभागाचे नाव करत असलेली शिवशंकर नगर भूम येथे राहत राहणारी कुमारी वैशाली शेटे , वयाच्या तिसाव्या वर्षी पोलीस विभागात नोकरीला असलेल्या पतीचे निधन झाल्यानंतर तीन मुलांना जिद्दीने घडवणाऱ्या श्रीमती उमाताई रणदिवे यांचा फेटा ,शाल ,गुलाबपुष्प व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला .सर्व कर्तबगार महिलांनी आपल्या जीवनावर प्रकाश टाकला. शिक्षणाचे महत्त्व सांगितले .
मनोगतात उमाताई रणदिवे म्हणाल्या की, “पोलीस विभागात कार्यरत असलेल्या पतींचे माझ्या वयाच्या तिसाव्या वर्षी निधन झाले. त्यावेळी मला तीन अपत्य होती . त्यापैकी एका अपत्याचे वय फक्त एक वर्ष होते . तरीही मी जिद्दीने तिन्ही मुलांना शिक्षण दिले कारण मला माझे शिक्षण न झाल्यामुळे मला खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. परंतु आज माझी मुलगी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे त्याचबरोबर मी सामाजिक कार्यात अग्रेसर असते . तसेच राजकारणाच्या माध्यमातूनही समाजकार्य करते आहे . त्यामुळे मुलांनो तुम्ही दर्जेदार शिक्षण घ्यावे आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे .संस्काराच्या बाबतीत आपण दक्ष असावे .असे सांगितले. “ हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. प्रा. अलका सपकाळ यांनी सातवी मध्ये विवाह झालेला असतानाही मुलाबरोबर शिक्षण घेऊन अध्यापन क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवला आहे . तसेच सात पुस्तकांचे लेखनही केलेले आहे हे करत असताना जीवनात अनेक संकटांवर मात केलेली आहे. असे सांगून मोबाईलचा वापर आपण ज्ञानासाठी वापर करावा असे सांगितले .कार्यक्रमाला मुख्याध्यापक तात्या कांबळे ,पवार काकासाहेब, पाटील दयानंद, पायघन उत्रेश्वर ,पवार बापूसाहेब ,जोशी अविनाश, गुंजाळ दत्तात्रय ' पवार नितीन ,शिंदे कैलास, संदीप ढगे,साठे हरीश, लक्ष्मी माने, अनंता झरकर ,विद्यार्थी , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .सूत्रसंचालन वैशाली विधाते यांनी केले तर आभार प्रदर्शन अविनाश जोशी यांनी मानले.