धाराशिव (प्रतिनिधी)- “हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णायक ठरेल,“ असे मत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केले. शेती, पायाभूत सुविधा, उद्योग आणि रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या या अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्राच्या विकासाची गती वाढेल, असे त्यांनी म्हटले.
रस्ते, महामार्ग आणि औद्योगिक प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाणार असून, महाराष्ट्रात तब्बल 15 लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यामुळे लाखो रोजगार निर्माण होतील आणि धाराशिवसह संपूर्ण राज्याच्या प्रगतीला नवे आयाम मिळतील.तसेच उद्योग जगताला चालना देण्यासाठी सदरील अर्थसंकल्पात महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशन स्थापन करण्यात आली आहे, त्यामुळे धाराशीव जिल्ह्याला या अंतर्गत मोठया प्रमाणावर फायदा होणार आहे.
“ऊर्जाक्षेत्रातील निर्णयांमुळे उद्योगांना स्वस्त वीज मिळेल, कृषी धोरणामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल आणि पायाभूत सुविधा बळकट झाल्याने महाराष्ट्राचा औद्योगिक आणि आर्थिक विकास वेगाने होईल,“ असेही त्यांनी नमूद केले. “हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या भविष्याला बळकटी देणारा असून, प्रगतशील राज्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे,“ असा विश्वासही दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केला.