धाराशिव (प्रतिनिधी )डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डाॅ. प्रशांत दीक्षित यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. प्रमुख अतिथी म्हणुन जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डाॅ. जितेंद्र कुलकर्णी यांनी विशेष व्याख्यान दिले. त्यांनी आपल्या व्याख्यानातुन विज्ञानाचे मानवी जीवनातील महत्व स्पष्ट केले.
भारत सरकारने या वर्षीच्या विज्ञान दिवसासाठी "विकसित भारतासाठी विज्ञान आणि जागतिक नेतृत्वासाठी भारतीय युवकांना सक्षम बनवणे" ही संकल्पना अंगिकारली आहे. त्या अनुषंगाने आयोजित व्याख्यानात डॉ. कुलकर्णी यांनी युवकांना विज्ञान,तंत्रज्ञान व अभियांत्रिकी मध्ये सक्षम करण्यासाठी समायोजित प्रयत्न करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, विद्यापीठ व सरकार यांनी एकत्रित कार्य करण्याची गरज विषद केली. या उद्दीष्टाच्या पूर्ततेसाठी असणाऱ्या अडचणी व त्यांचे निराकरण याचा आढावा घेतला.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्रा. डॉ. दीक्षित यांनी युवकांना सक्षम करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती सादर केली व विद्यार्थ्यांना याचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सर सि. व्ही. रमण यांचे संशोधन कार्य व त्याचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सुक्ष्म जीवशास्त्र विभागातील पदव्युत्तर व रसायन शास्त्र विभागातील विद्या-वाचस्पती ( पी. एचडी) विद्यार्थी यांनी विषेश परिश्रम घेतले.या कार्यक्रमात प्राध्यापक एम. के. पाटील,डॉ. हुंबे सर, श्री.परिवर्तन सर, श्री पडवळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. सुरेश चव्हाण यांनी केले.