परंडा (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालय मंजूर करण्यात यावे. अशी मागणी जय मल्हार जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून राज्य सरचिटणीस प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी परंडा तहसीलदार यांच्या मार्फत ना.आकाश फुंडकर कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदनाद्वारे केली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के ,फुले आंबेडकर विद्वत सभेचे जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.प्रकाश सरवदे ,जय मल्हार जनरल कामगार युनियन संघटना जिल्हाध्यक्ष आलिशान शेख ,भूम परंडा वाशी अध्यक्ष मोहम्मद शेख आदी उपस्थित होते.
जय मल्हार जनरल कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष दाजीराव मारकड यांच्या आदेशावरुण ही मागणी करण्यात आली.महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात बांधकाम मजूर, बिल्डर, प्लंबर, पेंटर, बिगारी, इलेक्ट्रिशियन कारखाना व बेकरी उद्योगांमध्ये काम करणारे कामगार यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे.महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनेक योजनांचा लाभ देण्यात येतो. परंतु कामगार आयुक्त कार्यालय हे जिल्ह्याच्या ठिकाणी असल्यामुळे अनेक कामगारांना अनेक अडचणीमुळे जिल्ह्याच्या ठिकाणी येणे जाणे शक्य नसल्यामुळे अनेक कामगार या लाभांपासून वंचित राहतात महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात कामगार उपायुक्त कार्यालय मंजूर केल्यास तालुक्यातील कामगारांना तालुक्याच्या ठिकाणी योग्य वेळेत लाभ मिळेल व एकही कामगार लाभापासून वंचित राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कामगार आयुक्त कार्यालय निर्माण करून कामगाराच्या हितात निर्णय घेण्यात यावा. जेणेकरून शोषित कामगार बांधवांना न्याय मिळेल असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी जय मल्हार जनरल कामगार युनियन संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.