भूम (प्रतिनिधी)- आर्यन गोरक्षनाथ खरड याची गुटुंर (आंध्र प्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र धनुर्विद्या असोसिएशन व रत्नागिरी जिल्हा धनुर्विद्या असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डेरवण जि. रत्नागिरी येथे दिनांक 28 फेब्रुवारी ते 02 मार्च या कालावधीत 16 व्या राज्यस्तरीय मिनी सब ज्युनिअर गटाच्या धनुर्विद्या स्पर्धा पार पडल्या आहेत.
सदर स्पर्धेमध्ये आर्यन खरड याने धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना 15 वर्षे वयोगटात सांघिक प्रकारात रौप्य व 13 वर्षे वयोगटात वैयक्तिक प्रकारात कांस्य पदक प्राप्त केले आहे. या कामगिरीच्या जोरावर त्याची मार्च अखेर गुटुंर (आंध्र प्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आर्यन हा ग्रीनलँड इंग्लिश स्कूल धाराशिवचा विद्यार्थी असुन इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. त्याला प्रशिक्षक प्रविण सावंत (सातारा), कैलास लांडगे (धाराशिव) यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल पोलीस अधीक्षक धाराशिव संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी भूम गौरीप्रसाद हिरेमठ, धाराशिव जिल्हा धनुविद्या असोसिएशनचे सचिव प्रविण गडदे, दृष्टी आर्चरी अकॅडमी साताराच्या सचिव सायली सावंत, ग्रीनलँड शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी स्वामी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.