धाराशिव (प्रतिनिधी)- सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आणि तातडीने तज्ञांच्या निगराणीखाली उपचार उपलब्ध व्हावे यासाठी वैद्यकीय महाविद्यालय शासनाने सुरू केले आहे. त्याठिकाणी रुग्णांना दिलासा देण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी बांधवांना कोणी वेठीस धरत असेल तर आपण हे कदापि सहन करणार नाही. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात उपद्रव माजविणाऱ्या समाजकंटकांचा तात्काळ कायदेशीर मार्गाने बंदोबस्त व्हायलाच हवा अशा शब्दात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलासा देत समाजकंटकांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे पोलीस प्रशासनाला निर्देश दिले.

समाजकंटकाकडून त्रास होत असल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसराला भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. रुग्णालय परिसर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपद्रव माजविणाऱ्या या समाजकंटकांवर तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांना दिल्या. यावेळी उपस्थित कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या अडीअडचणीही जाणून घेतल्या. उपस्थित करण्यात आलेल्या अडचणी दूर करण्याबाबत संबंधितांना आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या. या परिसरात पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांना निर्देश दिले. तसेच परिसरात सीसीटीव्ही व सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा व्यवस्था अधिक वाढविण्याबाबतही सांगितले.

महात्मा फुले जन आरोग्य व इतर आरोग्य योजनांच्या माध्यमातून शासनाकडून प्राप्त होणाऱ्या प्रती पूर्ती रकमेतून डॉक्टरांना प्रोत्साहनपर मानधन देण्याबाबतही त्यांनी आवर्जून महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान यांना सांगितले. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान, शल्यचिकित्सक डॉ. चाकूरकर, डॉ. लाकाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, बांधकाम विभागाचे अभियंता मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top