भूम (प्रतिनिधी)- दि. 3 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता मुंबई राजधानी येथे जाणारी एसटी बस वाशी-मुंबई जाणारी एसटी बसला खिडक्या ऐवजी पत्रे लावून पाठवण्यात आल्याने व खिडक्या नसणाऱ्या खिळखिळ्या बसमधून प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कधी पंक्चर, तर कधी रस्त्यातच अचानक बस बंद पडते. याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अधिकाऱ्यावर कारवाई करणार का ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
जानेवारी महिन्यात धाराशिव जिल्ह्यात इतर आगारांत नवीन बस आल्या आहेत. परंतु भूम आगाराला एकही नवीन बस मिळाली नाही. भूम एसटी आगारात 69 बस असून, इतर कामांसाठी आगारामध्ये यातील नऊ बस उभ्या आहेत. 60 बस प्रवासी वाहतूक करण्यासाठी सुस्थितीत असल्याचे सांगितले जात असले, तरी वस्तुस्थिती मात्र वेगळीच असल्याचे दिसून येत आहे. तर छोटे-मोठे स्पेअर पार्ट विभागीय कार्यालयाकडून उपलब्ध होत नसल्याने दुरुस्तीसाठी आलेल्या बस चार ते पाच दिवस आगारामध्येच उभा असल्याचे दिसून येते. सीटची दुरवस्था, खिडक्या जाम होणे, काही खिडक्यांना काच नसल्याचे दिसून आले. काही नवीन बस आहेत. परंतु आगारामधील यांत्रिकीकरण विभाग अद्ययावत नसल्यामुळे कामगारांना जुन्याच पद्धतीने दुरुस्तीचे काम करावे लागत आहे.
वेळेवर स्पेअर पार्ट मिळत नाहीत
विभागीय कार्यालयाकडून स्पेअर पार्टचा पुरवठा वेळेत होत नसल्याचे एसटी आगारातील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. स्पेअर पार्टचा पुरवठाही वेळेत होत नसल्याने एसटी आगारामध्येच उभी राहाते. त्यामुळे त्या दिवसाचे एसटीचे उत्पन्न बुडत आहे. तसेच आगारात चालक, वाहकांसह वाहतूक नियंत्रक, लिपिक व सफाई कामगाराची पदेही रिक्त आहेत.
याबाबत प्रभारी आगार प्रमुख यांच्याशी संपर्क साधला असता हिरकणी गाडी मुंबईला पाठवण्यात येते. परंतु आठ दिवसापासून क्लच प्लेटचे सामान उपलब्ध नसल्यामुळे जी गाडी उपलब्ध होती ती गाडी मुंबईसाठी पाठवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
श्रीकांत सुरवसे
प्रभारी आगार प्रमुख.