धाराशिव (प्रतिनिधी)- महायुती सरकारचा 2025 चा अर्थसंकल्प आर्थिक शिस्त पाळत सर्वच घटकांचा विचार करून मांडलेला अर्थसंकल्प असून शेतकरी, महिला, वृद्ध, तरुण, प्रत्येक समाज, राज्यातील प्रत्येक भागाला न्याय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. आज मांडलेल्या अर्थसंकल्पावर अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी मंत्री तथा आमदार राणाजगजीतसिंग पाटील यांनी दिले आहे.
आमदार पाटील यांनी मराठवाडा आणि जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी हा अर्थसंकल्प मोठा लाभदायक असल्याचे नमूद करीत, गोदावरी खोरे पुनर्भरण व मराठवाडा ग्रीडसाठी 37 हजार 668 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळी भूभागला नवसंजीवनी मिळणार आहे.
देशातील पहिला स्वतंत्र टेक्निकल टेक्स्टाईल पार्क एमआयडीसीच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील कौडगाव एमआयडीसीत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांसाठी 23 कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता राज्याला तांत्रिक वस्त्रोद्योगाचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याकरीता “महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन“ ची स्थापना करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा - 2 अंतर्गत सन 2024 -25 या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनाने या योजनेच्या अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ जाहीर केली आहे. बचत गटांच्या उत्पादकांना हक्काची बाजारपेठे उपलब्ध करून देण्यासाठी उमेद मॉल ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.
महायुती सरकारने जाहीर केलेल्या पर्यटन धोरणानुसार 10 वर्षात पर्यटन क्षेत्रात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात आपण पर्यटन वृद्धी आणि रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने जे महत्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत त्याला आवश्यक निधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याने याला आता मोठी बळकटी मिळणार असल्याचा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.