धाराशिव (प्रतिनिधी)- वारकरी संप्रदायात प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या संतश्रेष्ठ गोरोबाकाका यांच्या समाधीमंदिर परिसराला आता नवी झळाळी मिळणार आहे. संत गोरोबाकाका मंदिर व परिसराच्या विकास आराखड्याची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली असून, समाधीमंदिर परिसरात भव्य महाद्वार उभारणीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. वारकरी संप्रदायाच्या लौकिकाला साजेसे हे महाद्वार भाविकांना मोठा आत्मिक आनंद देईल. असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत गावातील ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते नुकतेच या भव्य महाद्वाराच्या कामाचे भूमीजन करण्यात आले. याबरोबरच तेर आणि परिसरात आणखी काही विकासकामे सुरू आहेत. आराखड्यातील उर्वरित कामेही येणाऱ्या काळात लवकरच सुरू होतील. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर प्राचीन तेर नगरीच्या सौंदर्यात आणखी भर पडणार असल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले आहे. वारकरी संप्रदायात संतश्रेष्ठ म्हणून गोरोबा काका यांच्या नावाची ख्याती आहे. तेरणा नदीच्या तीरावर वसलेल्या नगरीत श्री संत गोरोबाकाका यांचे प्राचीन समाधी मंदिर आहे. या मंदिर परिसरातील महाद्वाराचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

संतश्रेष्ठ गोरोबाकाका यांच्या समाधी मंदिरात दर एकादशीला भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. चैत्र महिन्यातील वार्षिक यात्रोत्सव या परिसरातील नागरिकांचे आकर्षन असते. त्याचबरोबर तेर नगरीत असलेल्या अनेक प्राचीन वास्तूंमुळे देखील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक आणि पर्यटकांचीदेखील सतत वर्दळ असते. यावेळी पद्माकर फंड, नवनाथ नाईकवाडी, जुनेद मोमीन, बालाजी पांढरे, विलास रसाळ, सुभाष कुलकर्णी, सतीश कदम, भूजंग खांडेकर, प्रजोत रसाळ, गणेश फंड, तानाजी बंडे, रजनीकांत पेठे, बिभीषण लोमटे, मज्जित मणियार, ग्रा. पं. सदस्य अजित कदम, नवनाथ पसारे, प्रवीण साळुंखे आदी उपस्थित होते.

 
Top