धाराशिव (प्रतिनिधी)-  लॉन्ड्रीला लागलेल्या आगीत फर्निचरसह ग्राहकांचे कपडे जळून खाक झाल्याची घटना शहरातील समतानगर भागात घडली. यात संबंधित लॉन्ड्री चालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

शहरातील समतानगर मध्ये नेताजी धोंगडे यांचे महालक्ष्मी लॉन्ड्री या नावाने दुकान आहे.  काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद केले होते. पहाटेच्या सुमारास दुकानातून अचानकपणे धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब दुकान मालक नेताजी धोंगडे यांना बोलवून घेतल्यानंतर आग विझवण्याचे प्रयत्न झाले. स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. यामध्ये दुकानातील सर्व फर्निचर, टेबल, कपाट, खुर्च्या जळून गेल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांचे लॉन्ड्री साठी आलेले कपडे,ड्रेस, साड्या ही जळून गेलेल्या आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग विझवताना फर्निचरचा गरम झालेला काच फुठून लॉन्ड्री मालक नेताजी आबा धोंगडे यांच्या पायाला इजा झाली आहे. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले आहे. 

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून दुकांनाच्या वरच्या मजल्यावर  निवासी प्लॅट आहेत. सुदैवाने आग तातडीने आटोक्यात आल्याने कोणतीही गंभीर दुर्घटना घडली नाही. जाळीत लॉन्ड्री दुकानाची आनंद नगर पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला आहे.

 
Top