धाराशिव (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने धाराशिव, तुळजापूर आणि औसा तालुक्यातील गावांसाठी महत्वपूर्ण असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्ती कामाची पहिली निविदा जाहीर करण्यात आली आहे. आपण सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. तीन तालुक्यातील 23 गावातील साधारणपणे 9 हजार हेक्टर क्षेत्र यामुळे ओलिताखाली येणार आहे.अशक्यप्राय वाटणाऱ्या या दुरुस्तीच्या कामासाठी तत्कालीन उप-मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी निधीची अभूतपूर्व तरतूद केली. अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या या योजनेतील स्थापत्य विभागाच्या कामाची निविदा आता जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामासही सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यात निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीसाठी आपल्या मागणीवरून टोकन प्रोव्हिजन अर्थात लेखाशीर्षकात निधीची तरतूद करण्यात आली. त्यामुळे आज निविदा प्रक्रियेचा टप्पा गाठता आला. आता प्रत्यक्ष दुरुस्ती कामासही लवकरच सुरुवात होईल. राज्याचे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील साहेबांनी मोठ्या भगीरथ प्रयत्न्याने सुरू केलेला हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याची जबाबदारी आपली असल्याचे आपण यापूर्वीच जाहीर केले होते. तुळजापूर, धाराशिव आणि औसा या तीन तालुक्यातील 23 गावांतील साधारणपणे 9 हजार हेक्टर क्षेत्रासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्ती खर्चास आपल्या महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वीच 113 कोटी रूपयांची प्रशासकीय मान्यता दिली होती. ठाकरे सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे सुरुवातीच्या अडीच वर्षात या प्रकल्पाच्या दुरूस्ती बाबत काहीच हालचाल झाली नाही. मात्र आपण केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेत मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी 113 कोटी रूपयांच्या दुरूस्ती प्रस्तावास तांत्रिक मान्यता दिली. अशक्यप्राय वाटणाऱ्या या योजनेच्या दुरुस्ती कामास महायुती सरकारच्या माध्यमातून आपण प्रशासकीय मान्यताही मिळवून घेतली.
या महत्वपूर्ण योजनेच्या दुरुस्तीसाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आपण स्वतः नोव्हेंबर 2022 मध्ये भेटून योजनेच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासंबंधी विनंती केली होती. त्यानुसार तत्कालीन उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याचवेळी जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले होते. पाच टप्प्याची असणारी ही योजना मागील अनेक वर्षे बंद असल्याने स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी या तिन्ही विभागाची दुरुस्ती आवश्यक होती. या तिन्ही विभागांचा सुसमन्वय साधून या तिन्ही विभागांकडून एकत्रित अंदाजपत्रक तयार करून घेणे मोठे जिकिरीचे काम होते. अनेक त्रुटींची पूर्तता करून या तिन्ही विभागाच्या समन्वयाने निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्ती कामासाठी 113 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकीय किमतीच्या कामास तांत्रिक मान्यता मिळवून घेतली. आणि त्यानंतर सलग पाठपुरावा करून प्रशासकीय मान्यताही मिळवून घेतली. जलसंपदा विभागात कोणत्याही प्रकल्प दुरूस्तीसाठी एकूण तरतुदीच्या कमाल 10 टक्के निधी खर्च करता येतो. निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरूस्तीसाठी मात्र तब्बल 113 कोटी रूपयांची आवश्यकता होती. त्यामुळे या प्रस्तावास खास बाब म्हणून मंजुरी मिळवून घेण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले. पाठपुरावा सुरूच ठेवला आणि अशक्यप्राय वाटणाऱ्या या महत्वपूर्ण योजनेला आपल्या सर्वांच्या पाठबळावर मोठी गती मिळाली आहे. आता लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
उपसा सिंचनसाठी 42 दलघमी पाणी राखीव
माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे तेंव्हाच आपल्या हक्काचे 42 दलघमी पाणी आरक्षित करून ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे धाराशिव, तुळजापूर आणि लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. आपल्या मागणीनुसार महायुती सरकारने विशेष बाब म्हणून 113 कोटी रूपयांच्या या दुरूस्ती प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असून त्यातील स्थापत्य विभागाच्या जीएसटी वगळून 32 कोटी रुपयांच्या कामाची निविदा जाहीर करण्यात आली आहे. पाच टप्प्यातील या योजनेत स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी आशा तिन्ही विभागाचे काम समाविष्ट आहे. स्थापत्य विभागासाठी 40 कोटी, यांत्रिकी विभागासाठी 43 कोटी 17 लाख आणि विद्युत विभागातील दुरुस्तीसाठी 30 कोटी 34 लाख अशा एकूण 113 कोटी 53 लाख रुपयांची अभूतपूर्व तरतूद केल्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व महायुती सरकारचे आभारही मानले आहेत.