धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडयासाठी अत्यंत महत्वाचा असणारा व मराठवाडयातील संपुर्ण जिल्हे जोडणारा धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर अशा रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करणेकरीता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून 6 कोटी रुपये एवढा निधी मंजुर करण्यात आला असल्याचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना पत्राव्दारे कळविले आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांच्याकडे सदर रेल्वेमार्गाच्या संदर्भात मागणी करण्यात आली होती. तसेच रेल्वे बोर्डाकडे सदर मार्गाच्या 2018-2019 मध्ये धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणानंतरचा अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे सादर करावा अशी विनंती विनंती करण्यात आली होती. सदर अहवाल रेल्वे बोर्डाकडे दि. 28/07/2022 रोजी, रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला होता. उत्तर-दक्षिण रेल्वे मार्ग (240 किमी) मराठवाडा विभागासाठी खूप महत्वाचा आहे आणि म्हणूनच या रेल्वे मार्गाचे बांधकाम खूप महत्वाचे आहे. भविष्यात दक्षिण भारताला उत्तर भारताशी थेट जोडण्यासाठी हा रेल्वे मार्ग महत्वाचा ठरू शकतो. यासोबतच छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, विभागीय कार्यालये, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ यासह जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेणी आणि जालना शहरातील लोह औद्योगिक केंद्र, राक्षस भुवन येथील शनी मंदीर पैठण यासह छत्रपती संभाजी नगर येथील विविध शासकीय अस्थापनाकडे जाणाऱ्या लोकांना याचा फायदा होईल. या रेल्वे मार्गासाठी 4857 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे मा. रेल्वे मंत्री महोदयाच्या निदर्शनास आणुन दिले होते. रेल्वे मंत्र्यांनी सदर मार्गास 6 कोटी रुपये नविन सर्व्हेक्षणाकरीता मंजुर केले आहेत. असे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना कळविले आहे.