धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला प्रतिसाद देत त्यांनी आज दिनांक 19 मार्च रोजी त्यांच्या मंत्रालयीन दालनात बैठक घेतली. बैठकीत  तामलवाडी, वडगाव,कौडगाव,वाशी एमआयडीसी सह धाराशिव येथील विमानतळा बाबत पाच महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. जिल्ह्यातील कुशल तरुणांना जिल्ह्यातच हक्काचा रोजगार मिळावा यासाठी आपण घेत असलेल्या प्रयत्नांना उद्योगमंत्र्यांनी पाठबळ दिले आहे. त्यामुळे या चारही  एमआयडीसीच्या माध्यमातून मोठ्या रोजगार निर्मितीच्या दिशेने सकारात्मक व ठोस पाऊल पडले असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

देशातील पहिला स्वतंत्र टेक्निकल टेक्स्टाईल पार्क एमआयडीसीच्या माध्यमातून कौडगाव येथे उभारण्यात येणार आहे. यापूर्वीच उद्योगमंत्री सामंत यांनी तशी घोषणा केली आहे. टेक्निकल टेक्स्टाईल या क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील नामांकित कंपन्यांसोबत उद्योगमंत्री स्वतः बैठक घेणार आहेत. आजघडीला उद्योग विभागाच्या धोरणानुसार ज्या सवलती दिल्या जात आहेत, त्याहून अधिकच्या सवलती धाराशिव जिल्ह्यात गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना देण्याचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच ज्या परदेशातील  कंपन्यांकडून आपण टेक्निकल टेक्सटाईल आयात करतो अशा कंपन्या शोधण्यासाठी कन्सल्टंट नेमण्यात आले असून त्यांना कौडगाव येथे उत्पादन करण्यासाठी निमंत्रण देण्याचेही या बैठकीत ठरले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. कौडगाव टेक्निकल टेक्सटाईल पार्कच्या पायाभूत सुविधांसाठी जे टेंडर काढण्यात आले आहे त्याचा आठवड्यात कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे.

सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तामलावडी येथील गुंतवणुकी बाबत एप्रिल महिन्यात उद्योग मंत्री उदय सामंत स्वतः सोलापूर येथे बैठक घेणार आहेत. या बैठकीत या इंडस्ट्रियल  पार्कच्या अनुषंगाने इच्छुक गुंतवणूकदार उद्योजक, सर्व संबंधित विभागाचे अधिकारी व एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी यांची ही बैठक घेण्यात येणार आहे. तामलवाडी एमआयडीसीत गुंतवणूक करण्यासाठी धाराशिव, सोलापूरसह राज्यातील 130 उद्योजकांनी उत्स्फूर्तपणे तयारी दर्शवली आहे. 367 एकरावर साकारण्यात येणाऱ्या या नवीन एमआयडीसीमध्ये टेक्सटाईलसाठी 80 तर गारमेंटसाठी 50 उद्योजक गुंतवणूक करण्यास तयार आहेत. या सर्वांसोबत एप्रिल महिन्यात उद्योग मंत्री संवाद साधणार असल्याचे आमदार पाटील|म्हणाले.

धाराशिव तालुक्यातील सिद्धेश्वर वडगांव येथील एमआयडीसीत मध्यम,लघु व सूक्ष्म उद्योग अर्थात 'एमएसएमई पार्क' स्थापन करण्याच्या अनुषंगाने या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली. यात सदर एमआयडीसीचे फायनल ले आउट करून त्याला महिनाभरात मंजुरी देण्याचेही ठरले. ले आउटची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वडगावच्या एमआयडीसीत 46 कोटी रुपयांच्या पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. धाराशिव या जिल्हा मुख्यालयापासून अगदी जवळ असलेल्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव एमआयडीसीत 80 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यापैकी  150 एकरचा औद्योगिक वापर करण्यात येणार आहे. यात 75 एकर जमिनीवर मध्यम,लघु व सूक्ष्म उद्योग () पार्क उभारण्यात येणार आहे.आपण केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा आणि परिसरातील तब्बल 94 उद्योजकांनी नोंदणी करून वडगाव एमआयडीसीत गुंतवणूक करण्यासाठी उत्स्फूर्तपणे तयारी दर्शविली असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील सांगितले आहे.


वाशी औद्योगिक वसाहतीत फायर वर्क्स पार्क व लॉजिस्टिक पार्क करण्याच्या अनुषंगाने लवकरच स्वारस्याची अभिव्यक्ती काढण्याचे ठरले आहे.


धाराशिव येथील विमानतळ 99 वर्षासाठी रिलायन्स कडे दीर्घकालीन लीज वर दिले होते ते आता परत घेण्यात आले आहे .येत्या 15 दिवसात सदर विमानतळ एमआयडीसी, एमएडीसी  किंवा केंद्र सरकारचे नागरी विमान वाहतुक मंत्रायल यांच्यापैकी कोण चालवण्यासाठी घेणार हे ठरणार आहे.त्यानंतर सदर विमानतळाच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ही अतिशय महत्वपूर्ण बैठक ठरली असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

बैठकीला अपर मुख्य सचिव (विमानचालन), सचिव (उद्योग), मुख्य कार्यकारी अधिकारी, म. औ.वि.म.,सह मुख्य कार्यकारी अधिकारी, मऔविम, जिल्हाधिकारी, धाराशिव (व्ही.सी.द्वारे) सह सचिव- (उद्योग 14) उप मुख्य कार्यकारी अधिकारी (3), मऔविम उप विभागीय अधिकारी, कळंब,तहसीलदार, वाशी, प्रादेशिक अधिकारी-मऔविम, लातुर व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 
Top