उमरगा (प्रतिनिधी)- धाराशिव व लातुर जिल्ह्यातील नागरिकांसाठी दि. 4 मार्चपासून शहरातील आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन दिवसीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात तपासणीपासुन औषधोपचार ते आवश्यक त्या शस्त्रक्रियेपर्यंतची सुविधा रहाणार आहे. महा रक्तदान शिबीरासह दिव्यांग आणि वयोवृद्धांना मोफत साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे युवा नेते तथा महाआरोग्य शिबीराचे प्रमुख शरण बसवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

माजी केंद्रिय मंत्री भगवानजी खुबा यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन होणार आहे.  जिल्हाधिकारी किर्ती किरण एच. पुजार अध्यक्षस्थानी असतील. जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी हृदयरोग, मधुमेह, स्त्रीरोग, नेत्र, कान, नाक, घसा आदी आजारावरील मोफत तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत. उमरगा, लोहारा तालुक्यासह औसा, निलंगा व कर्नाटकातील सीमावर्ती भागातील साधारणतः सात ते आठ हजार रुग्णावर मोफत तपासणी व औषधोपचारासह मोफत शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन शिबिराच्या निमित्ताने करण्यात आले आहे. बुधवारी (दि 5) महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. साधारणतः पाचशे रक्तदाते रक्तदान करतील, अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच उमरगा, लोहारा तालुक्यासह परिसरातील दिव्यांग व वृद्धांना साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. रुग्णांची तपासणी, योग्य औषध उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी लातूर, सोलापूर,धाराशिव जिल्ह्या सह उमरगा तालुक्यातील तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार असून, येथील रुग्णांवर मोफत स्वरूपाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिरात स्वतंत्र असे मोफत औषध वाटप कक्ष उभारण्यात आलेले आहे. 

या उपक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, उमरगा व लोहारा तालुक्यातील आशा  व अंगणवाडी ताई यांचे मोलाचे सहकार्य लाभत असून लॉयन्स क्लब, विवेकानंद हॉस्पिटल लातूर, महालॅब, श्रीकृष्ण रक्तपेढी यांच्यासह विविध संस्थांचे या उपक्रमासाठी सहकार्य मिळत असल्याचे पाटील यांनी सांगितले. महाआरोग्य शिबिराचा धाराशिव व लातूर जिल्ह्यासह कर्नाटक सीमावरती भागातील रुग्ण व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

 
Top